CJP press conference File Photo
राष्ट्रीय

CJP Abhijeet Dipke: ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं...; सीजेपीला स्वकीयांचाच सर्वात मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

प्रशांत भूषण आणि नेहा बोरा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सीजेपी बॅकफूटवर! डॅमेज कंट्रोलसाठी अभिजीत दीपके यांची मध्यरात्री पत्रकार परिषद

मोहन कारंडे

CJP Abhijeet Dipke

नवी दिल्ली: 'शांतता आणि अहिंसा' या गांधीवादी तत्त्वांचा जप करत आपली प्रतिमा निष्कलंक राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीला गुरुवारी स्वतःच्याच सहकाऱ्यांकडून मोठा धक्का बसला. 'नीट' पेपरफुटीविरोधातील आंदोलनापासून सीजेपीच्या व्यासपीठावर सक्रिय असलेल्या नेहा बोरा आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी गुरुवारी अशी काही विधाने केली, ज्यामुळे सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांना पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.

प्रशांत भूषण यांचे विधान आणि दीपके यांचे स्पष्टीकरण

गुरुवारी दिल्लीतील 'प्रेस क्लब'मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी थेट सत्तांतराची भाषा केली. "होय, आम्हाला देशात सत्तापालट हवा आहे. ही लढाईच त्यासाठी आहे आणि सत्तापालट होऊनच राहील," असे विधान भूषण यांनी केले. प्रशांत भूषण यांच्या या वक्तव्याचा भाजपने तत्काळ समाचार घेत सीजेपीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे पाहताच, आपली सर्वात मोठी भीती खरी ठरल्याचे अभिजित दीपके यांच्या लक्षात आले. अभिजीत दीपके यांनी मध्यरात्री कायदेशीर सल्लागार रत्ना सिंह यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

"आमची मागणी सत्तापालटाची नसून केवळ निष्पक्ष निवडणुकीची आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी न घेता फॉर्म-६ मध्ये बदल केले आहेत. आम्ही फक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवून नव्या निष्पक्ष व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी करत आहोत," असा दावा करत दीपके यांनी प्रशांत भूषण यांच्या विधानापासून अंतर राखण्याचा प्रयत्न केला.

नेहा बोरा यांच्या 'बांगलादेश' विधानावरूनही वाद पेटला

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात आणि काँग्रेसच्या रॅलींमध्ये सहभागी होणाऱ्या आयसा प्रमुख नेहा बोरा यांच्या एका वादग्रस्त व्हिडिओने या आगीत तेल ओतण्याचे काम केले. एका व्हिडिओमध्ये त्या असे म्हणताना ऐकू येते की, "सध्या संपूर्ण देशात जी 'जनरेशन झेड' चळवळ सुरू आहे, तिची सुरुवात प्रत्यक्षात बांगलादेशात झाली होती. आम्हाला मार्ग दाखवल्याबद्दल धन्यवाद." बांगलादेशातील हिंसक आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या या विधानानंतर भाजपने सीजेपीला घेरले आहे.

या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर दीपके यांनी स्पष्ट केले की, "आम्ही महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी आहोत. देशातील नागरिक म्हणून आम्ही शांततेच्या आणि अहिंसेच्या मार्गानेच तिरंगा फडकवत आमचा लढा पुढे नेऊ. आमच्या बाजूने कोणतीही हिंसा होणार नाही." याशिवाय सोशल मीडियावर एआयएसएफचे अध्यक्ष विराज देवांग यांचा व्हिडिओ शेअर करत दीपके म्हणाले, "भारतीय तरुणांना आवाज उठवण्यासाठी बांगलादेशाकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही. आपल्याकडे महात्मा गांधींचा मार्ग आहे, जो संपूर्ण जग स्वीकारते."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT