CJI Surya Kant Clarifies ‘Cockroach’ Remark After Criticism: भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या कथित ‘झुरळ’ (cockroach) टिप्पणीवरून निर्माण झालेल्या वादानंतर स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचे सांगत, आपण देशातील तरुणांवर टीका केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान CJI सूर्यकांत यांनी काही तरुणांबाबत केलेल्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता. बेरोजगार तरुण झुरळांसारखे होतात आणि नंतर मीडिया, सोशल मीडिया किंवा RTI कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर टीका करतात, असे त्यांनी म्हटल्याचा दावा करण्यात आला होता.
मात्र, शनिवारी CJI सूर्यकांत यांनी याबाबत भूमिका स्पष्ट करत माध्यमांवर वक्तव्याचा चुकीचा संदर्भ दिल्याचा आरोप केला. “माझ्या तोंडी निरीक्षणांचा चुकीचा अर्थ लावला गेला, हे पाहून मला वेदना होत आहेत,” असे त्यांनी म्हटले.
त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांची टीका बेरोजगार तरुणांवर नव्हती, तर बनावट पदव्या घेऊन वकिली व्यवसायात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर होती. “मी विशेषतः अशा लोकांवर टीका केली होती, जे खोट्या आणि बनावट पदव्यांच्या आधारे वकिलीसारख्या क्षेत्रात आले आहेत. अशाच प्रकारचे काही लोक मीडिया, सोशल मीडिया आणि इतर सन्माननीय क्षेत्रांतही शिरले आहेत. त्यामुळे मी त्यांना ‘parasites’ (परजीवी) म्हटलं,” असं CJI यांनी स्पष्ट केलं.
शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर एका वकिलाने वरिष्ठ वकील (Senior Advocate) दर्जासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या वेळी न्यायालयाने संबंधित वकिलाच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
खंडपीठाने संबंधित वकिलाला फटकारताना, वरिष्ठ वकील दर्जा हा पाठपुरावा करून मिळवण्याचा विषय नसल्याचे सांगितले. सुनावणीदरम्यान त्या वकिलाच्या फेसबुक पोस्टमधील भाषेचाही उल्लेख करण्यात आला.
याच चर्चेदरम्यान CJI सूर्यकांत यांनी समाजात व्यवस्थेवर सतत टीका करणाऱ्या काही लोकांचा उल्लेख करत वक्तव्य केले होते. याच वक्तव्याचा काही भाग सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि त्यावरून वाद निर्माण झाला.
दरम्यान, CJI सूर्यकांत यांनी भारतातील तरुणांबद्दल आदर व्यक्त करत, “देशाचे तरुण हे विकसित भारताचे आधारस्तंभ आहेत. मला भारताच्या आजच्या आणि उद्याच्या युवा शक्तीचा अभिमान आहे,” असेही म्हटले आहे.