राष्ट्रीय

CISF Security Action : दिल्ली मेट्रो स्थानकात थरार! अंतर्वस्त्रात संशयास्पद पदार्थ लपवून पळणाऱ्या 'NRI'च्या CISF जवानांनी आवळल्या मुसक्या

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील जामा मशीद मेट्रो स्थानकावर सोमवारी (दि. १९) सुरक्षा तपासणीदरम्यान एका प्रवाशाकडे संशयास्पद वस्तू आढळल्यानंतर खळबळ उडाली. तपासणीतून वाचण्यासाठी पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या या संशयित प्रवाशाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) सतर्क जवानांनी पाठलाग करून तात्काळ ताब्यात घेतले. आपण क्वालालंपूर येथे वास्तव्यास असलेले अनिवासी भारतीय (NRI) असल्याचा दावा संबंधित प्रवाशाने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (डीएमआरसी) जामा मशीद मेट्रो स्थानकावर नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू होती. त्यावेळी एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीमच्या (एक्सबीआयएस) स्क्रीनवर संबंधित प्रवाशाच्या बॅगेत एक संशयास्पद आणि अत्यंत दाट वस्तू सुरक्षा रक्षकांच्या निदर्शनास आली. आपली चोरी पकडली गेल्याचे लक्षात येताच सदर प्रवाशाने तिथून पलायन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीआयएसएफच्या जवानांनी विलक्षण प्रसंगावधान आणि अचूक समन्वय दाखवत तत्परतेने पाठलाग केला व स्थानकाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळच त्याला झडप घालून पकडले.

या कारवाईच्या संदर्भात समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये संबंधित प्रवासी सुरुवातीला फोनवर बोलताना दिसत असून, त्यानंतर तो स्वयंचलित जिन्यावरून (एस्केलेटर) बाहेर पडण्याच्या मार्गाच्या दिशेने धावताना स्पष्ट दिसत आहे. मात्र, सुरक्षा जवानाने प्रसंगावधान राखत पायऱ्यांवरून वेगाने धाव घेतली आणि प्रवाशाच्या आधीच वर पोहोचून त्याला पळून जाण्यापूर्वीच शिताफीने ताब्यात घेतले.

त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी त्याच्या सामानाची व कपड्यांची कसून झडती घेतली असता, त्याच्या अंतर्वस्त्राच्या शिवणीमध्ये अत्यंत हुशारीने लपवून ठेवलेला एक अज्ञात अर्ध-घन (सेमी-सॉलिड) पदार्थ आढळून आला. क्वालालंपूर येथे राहणारा अनिवासी भारतीय असल्याचा दावा करणाऱ्या या प्रवाशाला आणि त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या संशयास्पद साहित्याला पुढील सखोल तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. हा संशयास्पद पदार्थ नेमका कोणता आहे आणि तो मेट्रो स्थानकात कशासाठी आणण्यात आला होता, याबाबत पोलीस आता कसून चौकशी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT