Operation Sindoor China Pakistan military support file photo
राष्ट्रीय

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल चीनचा मोठा खुलासा; पाकिस्तानच्या मदतीसाठी युद्धभूमीवर होता चीनचा प्रत्यक्ष सहभाग

Operation Sindoor China Pakistan military support: गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोहन कारंडे

Operation Sindoor China Pakistan military support

नवी दिल्ली: भारताने गेल्या वर्षी मे २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संघर्षादरम्यान चीनने पकिस्तानला केवळ शस्त्रास्त्रांचा पुरवठाच केला नाही, तर त्यांचे तांत्रिक तज्ज्ञ आणि अभियंते थेट युद्धभूमीवर मदतीसाठी तैनात होते, असे चीनने प्रथमच अधिकृतपणे मान्य केले आहे. चिनी सरकारी वाहिनी 'सीसीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत एका वरिष्ठ चिनी अभियंत्याने हा खुलासा केला असून, यामुळे भारत-पाक संघर्षात चीनचा थेट हस्तक्षेप उघड झाला आहे.

गेल्या वर्षी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता; या हल्ल्यात २६ लोकांचा बळी गेला होता. भारताने याला प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' राबवले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादाशी संबंधित नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. भारताच्या या कारवाईत 'जैश-ए-मोहम्मद', 'लष्कर-ए-तोयबा' आणि 'हिजबुल मुजाहिदीन' यांसारख्या संघटनांशी संबंधित १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले होते.

युद्धभूमीवर चिनी अभियंते तैनात

गुरुवारी CCTV वर प्रसारित झालेल्या एका मुलाखतीत चीनच्या 'एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' अंतर्गत येणाऱ्या चेंगडू एअरक्राफ्ट डिझाइन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अभियंता झांग हेंग यांनी पाकिस्तानच्या लष्करी कारवायांना मदत करण्यात आपला थेट सहभाग असल्याचे सांगितले. मे २०२५ मध्ये झांग यांची टीम पाकिस्तानच्या हवाई तळावर उपस्थित होती. झांग यांनी सांगितले की, "मे महिन्यातील ५० अंश सेल्सिअस तापमान आणि सतत वाजणारे सायरन अशा कठीण परिस्थितीत आम्ही पाकिस्तानी हवाई दलाला तांत्रिक मदत पुरवत होतो. आमची उपकरणे युद्धात पूर्ण क्षमतेने काम करतील, याची खात्री करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट होते."

चीनकडून खरेदी केलेल्या विमानांचा वापर

त्यावेळी पाकिस्तानने चीनकडून खरेदी केलेली J-10CE ही अत्याधुनिक लढाऊ विमाने वापरली होती. ही विमाने ४.५ पिढीची असून ती चिनी बनावटीच्या 'PL-15' क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत. याच विमानांच्या देखभालीसाठी आणि प्रत्यक्ष तांत्रिक सहाय्यासाठी चिनी अभियंते पाकिस्तानात तळ ठोकून होते.

भारतासाठी चिंतेची बाब

चीनने पहिल्यांदाच अशा प्रकारे युद्धकाळात पाकिस्तानला प्रत्यक्ष मदत केल्याचे अधिकृतपणे मान्य केले आहे. यापूर्वी चीन केवळ उपग्रह माहिती किंवा गुप्तचर माहिती पुरवत असल्याचे मानले जात होते. मात्र, आता चिनी कर्मचारी थेट युद्धभूमीवर असल्याने भविष्यात पाकिस्तानसोबतच्या कोणत्याही संघर्षात भारताला चीनच्या या अदृश्य हाताचाही सामना करावा लागणार आहे.

सिप्रीच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तान गेल्या पाच वर्षांत आपल्या एकूण लष्करी गरजांपैकी ८०% पेक्षा जास्त शस्त्रास्त्रे चीनकडून आयात करत आहे. चीन आपल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची प्रत्यक्ष युद्धभूमीवरील चाचणी घेण्यासाठी पाकिस्तानचा वापर करत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले होते. या खुलाशामुळे भारतीय संरक्षण तज्ज्ञांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT