Robotic Dog Controversy | चिनी बनावटीचा रोबोटिक कुत्रा विद्यापीठाकडून स्वनिर्मित म्हणून सादर 
राष्ट्रीय

Robotic Dog Controversy | चिनी बनावटीचा रोबोटिक कुत्रा विद्यापीठाकडून स्वनिर्मित म्हणून सादर

एक्स्पोमध्ये गॅलगोटियास विद्यापीठाला स्टॉल रिकामा करण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : चिनी बनावटीचा रोबोटिक कुत्रा ‘ओरायन’ स्वनिर्मित असल्याचा दावा ग्रेटर नोएडा येथील गॅलगोटियास विद्यापीठाने एआय समिट एक्स्पोमध्ये केला. त्याचा समाजमाध्यमांवर पर्दाफाश झाल्यानंतर विद्यापीठाला आपला स्टॉल तत्काळ रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, हा रोबोटिक कुत्रा शिक्षणासाठी कसा वापरता येऊ शकतो, हे दर्शवण्यासाठी तेथे सादर करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण नंतर एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून विद्यापीठाकडून करण्यात आले. या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या मुद्द्यावरून एआय समिटवर टीका केल्याने राजकीय गदारोळ निर्माण झाला.

सोशल मीडियावर तीव्र टीका झाल्यानंतर हा वाद उफाळून आला. टीकाकारांनी दावा केला की, ‘ओरायन’ म्हणून सादर करण्यात आलेला रोबो प्रत्यक्षात चीनमधील युनिट्री रोबोटिक्स कंपनीचा ‘ युनिट्री गो 2’ मॉडेल आहे आणि तो विद्यापीठाची स्वतःची निर्मिती नाही.

विद्यापीठाचे स्पष्टीकरण; तरीही शंका कायम

वाद वाढल्यानंतर विद्यापीठाने निवेदन जारी करत स्पष्ट केले की, त्यांनी हा रोबोट स्वतः विकसित केल्याचा दावा कधीच केलेला नाही. हा रोबोट शैक्षणिक उद्देशाने खरेदी करण्यात आला असून, विद्यार्थी त्यावर प्रयोग करत आहेत. मात्र, समिटदरम्यानच्या एका व्हिडीओ क्लिपमध्ये विद्यापीठातील एका प्राध्यापकाने ‘ओरायन’ हा उत्कृष्टता केंद्रात विकसित केल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. प्रेक्षकांनी हा रोबो सुमारे 2 ते 3 लाख रुपयांना ऑनलाईन उपलब्ध असलेल्या ‘2’ सारखाच असल्याचे निदर्शनास आणले. विद्यापीठाच्या एक्सवरील स्पष्टीकरणालाही नंतर कम्युनिटी नोट लावण्यात आली.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

या प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत एआय समिटला “अव्यवस्थित पीआर शो” असे संबोधले. भारतीय डेटा विक्रीसाठी ठेवला जात आहे आणि चिनी उत्पादने सादर केली जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस पक्षानेही केंद्र सरकारवर टीका करत एआय क्षेत्रात भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT