नवी दिल्ली; वृत्तसंस्था : मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण लष्करी परिस्थितीदरम्यान चीनने फ्रेंच बनावटीच्या राफेल लढाऊ विमानाविरोधात खोटी माहिती पसरविण्यासाठी मोहीम राबवून जागतिक स्तरावर दिशाभूल करण्याचा मोठा कट रचला होता, असा गंभीर आरोप अमेरिकन-चिनी आर्थिक आणि सुरक्षितता पुनरावलोकन आयोगाने (यूएससीसी) आपल्या वार्षिक अहवालात केला आहे.
या उघडकीनंतर चीनच्या सायबर-प्रचार यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अमेरिकेच्या अहवालाने चीनची रणनीती जगासमोर आल्याने राफेलविरोधी खोट्या मोहिमेच्या पडद्याआडचा चेहरा आता उजेडात आला आहे.
अहवालानुसार, संघर्षाच्या काही तासांतच चीनमधून नियंत्रणात असलेल्या बनावट सोशल मीडिया खात्यांनी भारतीय वायुसेनेची विमाने पाडल्याचे दावे मोठ्या प्रमाणात प्रसारित करायला सुरुवात केली. पाकिस्तानने त्यावेळी पाच भारतीय विमाने पाडली, असा दावा केला होता, ज्यात तीन राफेल असल्याचे सांगण्यात आले. या दाव्यांना विश्वासार्हता मिळवून देण्यासाठी चीनने एआयच्या साहाय्याने तयार केलेली बनावट छायाचित्रे वेगाने व्हायरल करण्यात आली. या छायाचित्रांत भारतीय राफेलचे अवशेष दाखवून ती ‘चीनच्या शस्त्रास्त्रांनी पाडली’ असल्याचा खोटा संदेश पसरवण्यात आला.
यूएससीसीच्या अहवालात म्हटले आहे की, चीनच्या या मोहिमेचे उद्दिष्ट एकच होते. फ्रान्सच्या दसॉल्ट एव्हिएशनकडून जगभरात होणार्या राफेलच्या विक्रीवर प्रतिकूल प्रभाव टाकणे आणि त्याचवेळी स्वतःची जे-35 लढाऊ विमानांची मालिक जगासमोर ‘पर्याय’ म्हणून आक्रमकपणे पुढे करणे.भारतीय लष्कराने लगेचच पाकिस्तानचे दावे फेटाळले होते. संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानच्या ‘सहा विमाने पाडली’ या दाव्याला संपूर्णपणे खोटे ठरवले. भारतीय वायुसेनेच्या कोणत्याही राफेल विमानाचे नुकसान झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.