singapore cargo ship explosion near Kerala coast  Pudhari
राष्ट्रीय

China Thanks Indian Navy | चीनला मानावे लागले भारतीय नौदलाचे आभार; समुद्रात त्या रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर...

China Thanks Indian Navy | भारतीय नौदलाच्या जवानांची धाडसी बचाव मोहीम; शेवटी मदतीसाठी भारतच आला धावून

Akshay Nirmale

China Thanks Indian Navy cargo ship fire explosion

बीजिंग: केरळच्या किनार्‍याजवळ 9 जून रोजी आग लागलेल्या सिंगापूरच्या एमव्ही वान हाय 503 या मालवाहू जहाजावरील कर्मचाऱ्यांची यशस्वी सुटका केल्याबद्दल चीनने भारताचे आभार मानले आहेत.

या जहाजावर एकूण 22 कर्मचारी होते, त्यापैकी 14 चीनचे नागरिक होते, अशी माहिती भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी दिली. त्यांनी भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाच्या त्वरित कार्यवाहीबद्दल त्यांचे आभार मानले.

काय म्हणाले यू जिंग?

भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर म्हटले आहे की, "9 जून रोजी, एमव्ही वान हाय 503 हे जहाज केरळमधील अझिक्कलपासून 44 सागरी मैल दूर असताना जहाजावर स्फोट झाला आणि आग लागली.

जहाजावरील एकूण 22 कर्मचाऱ्यांपैकी 14 चीनी नागरिक होते, ज्यात तैवानमधील 6 जणांचा समावेश आहे. भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाने त्वरित आणि व्यावसायिक बचावकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत."

18 जणांना वाचवले, 4 जण अजुनही बेपत्ता

या घटनेत जहाजावरील 22 कर्मचाऱ्यांपैकी चार जण अद्याप बेपत्ता आहेत, तर पाच जण जखमी झाले असून 18 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पुढील शोधकार्य यशस्वी होईल आणि जखमी कर्मचारी लवकर बरे होतील अशी आशा चीनने व्यक्त केली आहे.

हे जहाज कोलंबोहून मुंबईजवळील न्हावाशेवा बंदर येथे जात असताना हा स्फोट झाला. कोझिकोडपासून सुमारे 70 सागरी मैल दूर असताना जहाजावरील एका कंटेनरमध्ये स्फोट होऊन मोठी आग लागली. जहाज सध्या भरकटलेल्या अवस्थेत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून या जहाजावरील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तेल गळतीचा इशारा

भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (INCOIS) समुद्रात वाहून गेलेल्या कंटेनर, मोडतोड किंवा व्यक्तींचा मागोवा घेण्यासाठी आपले शोध आणि बचाव सहाय्य साधन (SARAT) कार्यान्वित केले आहे. ‘इन्कॉइस’ने संभाव्य तेल गळतीचा इशाराही दिला आहे.

तेल गळतीचे नेमके प्रमाण अद्याप समजू शकलेले नाही, तथापि, हवामान अंदाजानुसार 10 जून ते 13 जून या कालावधीत तेल किनाऱ्याच्या समांतर वाहत जाईल आणि यावर सतत देखरेख ठेवली जात आहे.

स्थानिक प्रशासनाला किनारी भागातील पाळत वाढवण्याचे आणि संभाव्य सागरी किंवा किनारी धोक्यांसाठी समुदायांना तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे सागरी मार्गावरील सुरक्षिततेचा आणि अशा अपघातांना प्रतिसाद देण्याच्या यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भारताची भूमिका महत्त्वाची...

हिंदी महासागर क्षेत्रात अशा घटनांमध्ये त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्याची क्षमता भारताने वेळोवेळी सिद्ध केली आहे. हिंद महासागर क्षेत्रात 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' म्हणून भारताची भूमिका या घटनेतून अधिक बळकट झाली आहे.

भारताच्या 'सागर' (SAGAR - Security and Growth for All in the Region) या धोरणाअंतर्गत शेजारील आणि मित्र राष्ट्रांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास भारत नेहमीच वचनबद्ध राहिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT