नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांनी रविवारी भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारला. तिन्ही सैन्य दलांचे एकत्रीकरण आणि थिएटर कमांडची (सैन्य दलांचे संयुक्त कमांड मॉडेल) निर्मिती करणे ही त्यांच्यासमोरील मुख्य उद्दिष्टे असतील.
पाकिस्तान आणि चीनच्या सुरक्षा विषयक बाबींचे सखोल अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे जनरल सुब्रमणी यांनी जनरल अनिल चौहान यांची जागा घेतली आहे. जनरल चौहान यांचा कार्यकाळ शनिवारी पूर्ण झाला. पदभार स्वीकारल्यानंतर जनरल सुब्रमणी यांनी सैन्य दलातील सुधारणा आणि तिन्ही दलांमधील समन्वय ही आपली प्राथमिकता असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही आमच्या सशस्त्र दलांमध्ये स्वदेशी शस्त्रास्त्रांचा विकास, समावेश आणि एकत्रीकरणाला गती देऊ. तसेच भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी सैन्य पूर्ण व्यावसायिकतेने काम करत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
चार दशकांचा प्रदीर्घ अनुभव
डिसेंबर 1985 मध्ये 8 गढवाल रायफल्समध्ये कमिशन मिळालेल्या जनरल सुब्रमणी यांचा लष्करातील अनुभव तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त आहे. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय लष्करी अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी आपल्या कारकिर्दीत व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि सेंट्रल कमांडचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदक आणि अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी स्वीकारली नौदल प्रमुखपदाची धुरा
अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या सेवानिवृत्तीनंतर अॅडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांनी रविवारी नवे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.
याआधी अॅडमिरल स्वामिनाथन हे नौदलाच्या पश्चिम कमांडचे कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत होते.
देशाच्या सुरक्षा आणि आर्थिक हितांचे रक्षण करण्यासाठी नौदलाची युद्धसज्जता सर्वोच्च पातळीवर ठेवण्यास आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आव्हानात्मक आणि अनिश्चित प्रादेशिक वातावरणात भारतीय नौदल सदैव सतर्क असून नवीन तंत्रज्ञानाच्या जोडीने आधुनिकीकरणाचा वेग वाढवला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.