नवी दिल्ली : मोठ्या पदावर काम करणारी व्यक्ती जेव्हा अचानकपणे एखाद्या छोट्या हॉटेलमध्ये विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना आढळते, तेव्हा आपण क्षणभर अचंबित होतो. अशीच घटना बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या कँटिनमध्ये घडली. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे विविध प्रकरणांची सुनावणी करून शिणले होते. त्यामुळे फ्रेश होण्यासाठी त्यांनी तेथील कँटिन गाठून समोसा आणि कॉफीचा आस्वाद घेतला.
सोबत ते आपल्या काही सहकार्यांनाही घेऊन गेले होते. साक्षात सरन्यायाधीश कँटिनमध्ये आल्याचे पाहून तेथील कर्मचार्यांची काही काळ तारांबळ उडाली. मात्र, सामान्य ग्राहकाप्रमाणे सरन्यायाधीशांनी कसलाही बडेजाव न दाखविता समोसा आणि कॉफी घेतली. यावेळी त्यांनी काही काळ माध्यमांशीही संवाद साधला. सोबतच त्यांनी ई-पास प्रणालीचा आढावाही घेतला. त्यांचा साधेपणा सध्या कौतुकाचा विषय ठरला आहे.