सरन्‍यायाधीश धनंजय चंद्रचूड. File photo
राष्ट्रीय

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस : १० नोव्हेंबरला होणार निवृत्त

Chief Justice Dhananjay Chandrachud |

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या कामकाजाचा शेवटचा दिवस शुक्रवार (८ नोव्हेंबर) होता. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची १३ मे २०१६ रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदावरून सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती झाली. त्यानंतर ८ नोव्हेंबर २०२२ रोजी देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली होती. त्यांच्या कार्यकाळात, ते १ हजार २७४ खंडपीठांचा भाग होते. त्यांनी एकूण ६१२ निवाडे लिहिले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सध्याच्या न्यायाधीशांमध्ये सर्वाधिक निकाल लिहिले आहेत. शेवटच्या दिवशीही त्यांनी ४५ खटल्यांची सुनावणी केली.

शुक्रवारी त्यांच्या निरोपासाठी औपचारिक खंडपीठ सुरु होते. यावेळी न्यायमूर्ती मनोज मिश्रा, न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला, ज्येष्ठ वकील, तसेच १० नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणारे न्यायमूर्ती संजीव खन्ना उपस्थित होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलतर्फे त्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णय

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळातील प्रमुख निर्णयांमध्ये कलम ३७०, रामजन्मभूमी मंदिर, वन रँक-वन पेन्शन, सबरीमाला मंदिर वाद, निवडणूक रोख्यांची वैधता आणि सीएए-एनआरसी यासारख्या निर्णयांचा समावेश आहे.

सर्वोच्च न्यायालयात तंत्रज्ञानाचा वापर वाढला

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या कार्यकाळात न्यायालयात तंत्रज्ञानाचा वापर वाढला. यामध्ये ई-फायलिंग, पेपरलेस सबमिशन, प्रलंबित खटल्यांसाठी व्हॉट्सॲप अपडेट्स, डिजिटल स्क्रीन, वाय-फाय सुविधा, प्रगत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, प्रलंबित प्रकरणांचा थेट मागोवा, या सारख्या गोष्टींचा समावेश आहे. त्यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात राष्ट्रीय न्यायिक संग्राहलयाचे उद्‌घाटन करण्यात आले. या संग्राहलयात एआय वकील आहे. जो कायद्याच्या जटील बाबी सोप्या पद्धतीत समजावून सांगतो.

सर्वोच्च न्यायालयातील न्याय देवतेचे रूप बदलले

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ग्रंथालयामध्ये ठेवलेल्या न्याय देवतेच्या मूर्तीचे स्वरुप बदलले. देशातील कायदा आंधळा नाही आणि ते शिक्षेचे प्रतीक नाही, असा संदेश देणे हा त्याचा उद्देश आहे. ग्रंथालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी नसून हातात तलवारी ऐवजी संविधान देण्यात आले आहे. याशिवाय १ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायपालिकेच्या राष्ट्रीय परिषदेच्या समापन कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वज आणि बोधचिन्हाचेही प्रकाशन करण्यात आले.

सरन्यायाधीश होणारी एकमेव पिता-पुत्र जोडी

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ पर्यंत म्हणजेच सुमारे ७ वर्षांचा होता. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे वडिलांच्या निवृत्तीनंतर ३७ वर्षांनी त्याच पदावर बसले. त्यांनी सुप्रीम कोर्टातील त्यांच्या वडिलांचे दोन मोठे निर्णयही रद्द केले आहेत.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची कारकिर्द

- जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी

- वडील वाय. व्ही. चंद्रचूड हे भारताचे १६ वे सरन्यायाधीश, आई प्रभा चंद्रचूड या ऑल इंडिया रेडिओच्या गायिका होत्या

- दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि गणित विषयात पदवी

- १९८२ रोजी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी

- १९८३ साली हार्वर्ड विद्यापीठातून एलएलएमची पदवी तसेच तिथूनच ज्युरीडिकल सायन्सेसची डॉक्टरेट

-शिक्षण पूर्ण केल्यानंतर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्रमध्ये वकील

- वकील म्हणून काम करत असताना १९८८ ते १९९७ या काळात मुंबई विद्यापीठात कायद्याचे प्राध्यापक कार्यरत

- १९९८ मध्ये अवघ्या ३८ व्या वर्षी वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्ती, पुढे भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणूनही त्यांनी काम केले.

- २९ मार्च २००० रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी २०१३ पर्यंत कार्यरत

- २०१३ ते २०१६ या काळात अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत

-२०१६ ते २०२२ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश

- २०२२ ते नोव्हेंबर २०२४ भारताचे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना हे असतील ५१ वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे ५१ वे सरन्यायाधीश असतील. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती खन्ना यांच्या नावाची सरकारकडे शिफारस केली होती. न्यायमूर्ती खन्ना यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांचा असेल. ६४ वर्षीय न्यायमूर्ती खन्ना १३ मे २०२५ रोजी निवृत्त होणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT