गरिबांद (छत्तीसगड); वृत्तसंस्था : पूर्व छत्तीसगडमधील गरिबांद जिल्ह्यातील घनदाट जंगलात कार्यरत असलेल्या प्रतिबंधित भाकपच्या (माओवादी) उडंती एरिया कमिटीला मोठा धक्का बसला आहे. या समितीशी संबंधित सात कट्टर सदस्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे, अशी माहिती पोलीस अधिकार्यांनी शनिवारी दिली.
शरणागती पत्करलेल्यांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. हे सदस्य गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते आणि 2018 पासून या भागात झालेल्या अनेक हिंसक घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्यावर एकूण 37 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. गरिबांद जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निखिल राखेचा यांनी सांगितले की, उडंती एरिया कमिटीच्या सचिवाने यापूर्वीच सशस्त्र चळवळ सोडण्याची तयारी दर्शविली होती.
या सदस्यांनी (ज्यांची नावे अर्जिता टेकाम ऊर्फ सुरेश, बुधरू ऊर्फ अनिता, सुले ऊर्फ जगत सिंग, विद्या सोडी ऊर्फ जमली, कांती ऊर्फ मावळी, नंदनी आणि मलेश अशी आहेत.) सांगितले की, त्यांना हळूहळू माओवादी संघटनेची पोकळ आणि विकासविरोधी विचारसरणी लक्षात आली आणि ते सन्मानाचे जीवन जगण्यास उत्सुक होते.