छत्रपती शिवाजी महाराज  File Photo
राष्ट्रीय

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मारक लवकरच मूर्तस्‍वरुपात

Chhatrapati Shivaji Maharaj | शासन निर्णय पारित

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा ३९५ वी जयंती संपन्न झाली. यावेळी आग्रा येथे झालेल्‍या शिवजयंती उत्‍सवात महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्‍मारक उभारण्यात येईल व यासाठी अर्थसंकल्‍पात स्‍मारकासाठी निधी दिला जाईल अशी घोषणा केली होती. आता यावर कार्यवाही सुरु झाली असून आज शासनाने यासंबधी शासन निर्णय पारित केला आहे. यासाठी पर्यटन विभागाला नोडल विभाग म्‍हणून निर्देशीत केले आहे.

‘आग्र्याहून सुटका’ ही शिवाजी महाराजांच्या देदिप्यमान जीवनातील व स्‍वराज्‍याच्या इतिहासातील महत्‍वाची घटना, महाराजांनी रयतेसाठी स्‍वराज्‍य निर्माण केले. ते टिकवून ठेवण्यासाठी त्‍यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. यामध्ये मुघलांचे सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबरच्या तहात अनेक गडकिल्‍ले मुघलांना द्यावे लागले. तसेच या तहातील अटीनुसार महाराजांना मुघल दरबारात उपस्‍थित रहावे लागले. त्‍याठिकाणी त्‍यांचा अपमान करण्यात आला. स्‍वाभिमानी महाराजांनी तत्‍काळ दरबार सोडला. पण मुघलांनी आग्रा येथे त्‍यांना नजर कैदेत ठेवले. पण अत्‍यंत चातुर्याने महाराज आग्रा येथून महाराष्‍ट्रात सुखरुप परतले. या इतिहासातील घटनेचा साक्षिदार असलेली व शिवाजी महाराज ज्‍याठिकाणी मुक्‍कामास होते ती जागा अधिग्रहीत करुन त्‍याठिकाणी स्‍मारक उभारणार आहे.

आग्रा येथे जाणारा पर्यटक आवर्जून छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले होते त्‍याठिकाणी जातो. पण सध्या तेथे कोणतेही ऐतिहासिक वास्‍तू, स्‍मारक, संग्रहालय नाही त्‍यामुळे त्‍याविषयी अधिक माहिती पर्यटकांना समजत नाही. या सर्वांचा विचार करुन शासनाने याठिकाणी स्‍मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

उत्तरप्रदेशमधील आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी मुक्‍काम केलेली जागा अधिग्रहीत केली जाणार आहे. त्‍यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहास पर्यटकांना माहिती व्हावा यासाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. यामध्ये संग्रहालय, माहितीपट यांचा समावेश असेल. या कामासाठी पर्यटन विभाग नोडल विभाग म्‍हणून काम पाहिल तसेच शासनस्‍तरावर पर्यटनमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली इतिहासतज्ञांची समिती नेमली जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आज महाराष्‍ट्र शासनाने पारित केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT