पुढारी ऑनलाईन : Chardham Yatra 2025 : चारधाम यात्रेला हिंदू संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. चारधाम यात्रेचा शुभारंभ ३० एप्रिल पासून होणार आहे. ३० एप्रिल रोजी गंगोत्री आणि यमनोत्री मंदिरांचे कपाट उघडण्यात येणार आहेत. तर २ मे रोजी केदारनाथ आणि ४ मे रोजी बद्रीनाथ मंदिराचे कपाट उघडण्यात येणार आहेत. हेमकुंड साहेबचे कपाटही २५ मे रोजी खुले होणार आहेत. चारधाम यात्रेसाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. आतापर्यंत चारधाम यात्रेसाठी एकूण नोंदणीचा आकडा १९ लाखांच्या पुढे पोहोचला आहे. यमुनोत्री धामसाठी ३ लाखांहून अधिक भक्तांनी नोंदणी केली आहे. तर गंगोत्री धामसाठी नोंदणीचा आकडा ३ लाखांच्यावर पोहोचला आहे.
सर्वात जास्त नोंदणीही केदारनाथ धामसाठी झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जवळपास ६ लाख ४८ हजार लोकांनी दर्शनासाठी नोंदणी केली आहे. तर शिख भक्तांच्या प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या हेमकुंड साहिबसाठी आतापर्यंत ५ लाख ७४ हजारहून अधिक लोकांनी नोंदणी केलेली आहे.
बद्री-केदार मंदिर समिती (BKTC) चे सीईओ विजय प्रसाद थापलियाल यांनी केदारनाथ धाम परिसराची स्थळ पाहणी केली. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून चारधाम यात्रा सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चारधाम यात्रा मार्ग दुरूस्ती विभागाने कार्याचा वेग वाढवला आहे. विभागाचे मुख्य अभियंता राजेश चंद्र शर्मा म्हणाले की, ही यात्रा एकूण ७३९ किमी लांबीच्या रस्त्याच्या मार्गानेच होते, ज्यामध्ये चार एजन्सी सतत काम करत आहेत. ते म्हणाले की, ज्या भागात भूस्खलनाच्या घटना घडतात. त्या भागांचीही नोंद करण्यात आली आहे. तिथे विशेष दुरुस्तीचे काम केले जात आहे. २५ एप्रिलपर्यंत सर्व रस्ते सुधारणा कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.