नवी दिल्ली: लोकसभेत शुक्रवारी गदारोळ सुरुच राहिला. काँग्रेसने भाजप खासदार निशिकांत दुबे आणि संबित पात्रा यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिला आहे. मात्र, यावर लोकसभा अध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावरून काँग्रेस खासदारांनी सभागृहात गदारोळ केला.
काँग्रेसचा हा विशेषाधिकार प्रस्ताव लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात आहे. अदानी प्रकरणाच्या भीतीने भाजप पळ काढत असून त्यांना संसदेचे कामकाज होऊ द्यायचे नाही, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांवरही दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. राहुल गांधींवर 'देशद्रोहा’चा आणि 'सोरोस’ प्रकरणी केलेल्या टिप्पणी केल्याबद्दल काँग्रेसने भाजपच्या दोन्ही खासदारांविरुद्ध विशेषाधिकार भंग प्रस्ताव दाखल केला.
काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले की, विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव मांडला आहे. यावर आम्हाला लोकसभा अध्यक्षांकडून निर्णय हवा होता, मात्र प्रश्नोत्तराचा तास पुढे ढकलण्यात आला. ज्या व्यक्तीच्या विरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला होता त्यांना पुन्हा संसदेत बोलू दिले गेले. संसदेचे कामकाज होऊ न देण्याच्या षड्यंत्राचा हा भाग असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसने आज पुन्हा निदर्शने केली
अदानी प्रकरणावर संसदेत चर्चेची मागणी करत काँग्रेस सरकारवर सातत्याने दबाव आणत आहे. शुक्रवारी वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राजद आणि इतर काही विरोधी पक्षांच्या सदस्यांनी संसद भवन संकुलात निदर्शने केली. काँग्रेस खासदारांनी हातात संविधानाची प्रत आणि तोंडावर काळा मास्क परिधान केला होता. मास्कवर ‘मोदी-अदानी भाई भाई’ अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.