पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी चांद्रयान-५ च्या बाबतीत मोठी माहिती दिली आहे. केंद्र सरकारने चांद्रयान-५ मोहिमेला मान्यता दिली आहे. चांद्रयान-३ मोहिमेत २५ किलो वजनाचा रोव्हर प्रज्ञान चंद्रावर पाठवण्यात आला होता, तर चांद्रयान-५ मोहिमेत २५० किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवला जाईल.इस्रो चांद्रयान-५ मोहिमेद्वारे चंद्राचा अभ्यास करेल, अशी माहिती इस्रोच्या एका कार्यक्रमात व्ही. नारायणन यांनी दिली.
यावेळी व्ही. नारायणन म्हणाले की, चांद्रयान मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जात आहे. २००८ मध्ये चांद्रयान-१ ने चंद्राच्या पृष्ठभागावरील रसायने, खनिजे यशस्वीरित्या शोधून काढली आणि चंद्राचे भू-स्थानिक मॅपिंग देखील केले. चांद्रयान-२ मोहिमेने ९८ टक्के उद्दिष्ट साध्य केले. चांद्रयान मिशन-३ च्या माध्यमातून, यशस्वी लँडिंग आणि रोव्हरद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल माहिती गोळा केली जात आहे. चांद्रयान-२ मोहिमेअंतर्गत पाठवण्यात आलेला रिझोल्यूशन कॅमेरा अजूनही चंद्राचे शेकडो फोटो पाठवत आहे.
भविष्यातील प्रकल्पांबाबत नारायणन यांनी सांगितले की, २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या चांद्रयान-४ मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट चंद्रावरील मातीचे नमुने संकलित करून त्यांना पृथ्वीवर परत आणणे आहे. गगनयानसह अनेक मोहिमांव्यतिरिक्त, भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याच्या योजनांवरही काम सुरू आहे.
चांद्रयान-४ मोहिमेला सप्टेंबर २०२४ मध्ये अधिकृत मान्यता देण्यात आली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मंत्रिमंडळाने या मोहिमेला मंजुरी दिली होती. या मोहिमेचा उद्देश चंद्रावर अंतराळयान उतरवणे, चंद्राच्या मातीचे आणि खडकांचे नमुने गोळा करणे तसेच त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणणे हा आहे. या मोहिमेसाठी एकूण २१०४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या अंतराळयानात पाच वेगवेगळ्या प्रकारची मॉड्यूल्स असतील. तुलनेत, २०२३ मध्ये चंद्रावर पाठवलेल्या चांद्रयान-३ मध्ये केवळ तीन मॉड्यूल्स होती - प्रोपल्शन मॉड्यूल (इंजिन), लँडर आणि रोव्हर.
चांद्रयान-४ च्या स्टॅक १ मध्ये चंद्रावरील नमुने संकलित करण्यासाठी असेंडर मॉड्यूल आणि पृष्ठभागावर नमुना संकलनासाठी डिसेंडर मॉड्यूल असेल. स्टॅक २ मध्ये थ्रस्टसाठी प्रोपल्शन मॉड्यूल, नमुने ठेवण्यासाठी ट्रान्सफर मॉड्यूल आणि पृथ्वीवर नमुने परत आणण्यासाठी री-एंट्री मॉड्यूल असणार आहे.या मोहिमेसाठी दोन वेगवेगळे रॉकेट्स वापरण्यात येतील. हेवी-लिफ्टर LVM-3 आणि इस्रोचे विश्वासार्ह वर्कहॉर्स PSLV वेगवेगळे पेलोड्स वाहून नेतील.