पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून चंदीगड महापालिकेच्या सभेत काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये आज (दि.२४) जोरदार खडाजंगी होऊन हाणामारी झाली. यावेळी झालेल्या गोंधळात दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
चंदीगड महापालिकेच्या बैठकीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात ठराव मांडला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर भाजप नगरसेवकांनी पंडित नेहरूंच्या काळात काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप केला.
यावेळी काही नगरसेवकांनी अनिल मसिह यांना मत चोर म्हटले. तर मसिह यांनी वेलमध्ये येऊन राहुल गांधीही जामिनावर बाहेर असल्याचे सांगितले. यावर्षी जानेवारीमध्ये चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या मनोज सोनकर यांना १६ मते मिळाली होती. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांना १२ मते मिळाली. रिटर्निंग ऑफिसर यांनी अनिल मसिह यांना पडलेली ८ मते बेकायदेशीर ठरवली.
या निवडणुकीनंतर काँग्रेस आणि आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ५ फेब्रुवारीरोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अनिल मसिह यांच्यावर तिखट टीका केली होती. चंदीगड महापौर निवडणुकीदरम्यान जे काही घडले. ते लोकशाहीची 'हत्या' आणि 'चेष्टा' असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने अनिल मसिह यांना अवमानाची नोटीसही बजावली होती. अनिल मसिहने कोर्टात मतपत्रिकेवर क्रॉस मार्क केल्याचे कबूल केले होते.
अनिल मसिह यांच्यावर चंदीगड महापौर निवडणुकीत बॅलेट पेपरने फसवणूक केल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.