नवी दिल्ली: झारखंड विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबरोबर होणार आहे. या निवडणुकीच्या अगोदर झारखंडमध्ये भाजपने पक्ष मजबूत करायच्या दृष्टीने मोठे पाऊल टाकले. झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन ३० ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. रांची येथे हा पक्षप्रवेश (Champai Soren joins BJP) होईल. यासाठी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याचे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितले.
झारखंडमधील कथित जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री चंपई सोरेन यांची वर्णी लागली. मात्र, हेमंत सोरेन यांना या प्रकरणात जामीन मिळाल्यावर त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची खुर्ची स्वतःकडे घेतली. यामुळे चंपई सोरेन त्यांच्या पूर्वीच्या झारखंड मुक्ती मोर्चा पक्षावर नाराज झाले आहेत. त्यांच्या नाराजीनंतर भाजप प्रवेशाच्या चर्चा झाल्या. दरम्यान त्यांनी दिल्ली दौरा केला. मात्र, चंपई सोरेन यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चा नाकारल्या होत्या.
अखेर सोमवारी (२६ ऑगस्ट) रात्री उशीरा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत चंपई सोरेन यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरला. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपला निवडणुकीत आदिवासी चेहरा मिळाला आहे. याचा फायदा सत्ताधारी जेएमएम विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजप घेणार आहे.