नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यात कथित प्रोटोकॉल उल्लंघन झाल्याच्या मुद्द्यावरून राजकीय वाद चांगलाच तापला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला असून राज्याच्या मुख्य सचिवांना ‘ब्लू बुक’मधील नियमांचे पालन झाले की नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.
या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही टीका करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर राष्ट्रपतींचा अपमान केल्याचा आरोप केला. दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्रपती मुर्मू या संथाल आदिवासी परंपरेशी संबंधित महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र त्या कार्यक्रमाकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.
शनिवारी राष्ट्रपती मुर्मू या बागडोगरा विमानतळाजवळील आदिवासी समाजाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये गेल्या होत्या. मात्र कार्यक्रमस्थळी उपस्थिती, व्यवस्थेतील त्रुटी आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे हा मुद्दा वादग्रस्त ठरला. प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती राज्यात येताना मुख्यमंत्री किंवा वरिष्ठ मंत्री, मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक उपस्थित असणे अपेक्षित असते. परंतु या वेळी केवळ सिलीगुडीचे महापौर स्वागतासाठी उपस्थित होते, असे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य प्रशासनाला पत्र पाठवून ‘ब्लू बुक’मधील प्रोटोकॉल नियमांचे उल्लंघन झाले का याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. ‘ब्लू बुक’ हा अत्यंत गोपनीय दस्तावेज असून त्यामध्ये राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या सुरक्षा व प्रोटोकॉलसंबंधी नियम निश्चित केलेले असतात.
दरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनीही कार्यक्रमातील कमी उपस्थितीबाबत नाराजी व्यक्त केली होती. हा कार्यक्रम मूळतः बिधाननगर येथे आयोजित होणार होता मात्र प्रशासनाने तो बागडोगरा विमानतळाजवळ हलवला. त्यामुळे लोकांना कार्यक्रमस्थळी पोहोचणे कठीण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, या प्रकरणामुळे केंद्र आणि पश्चिम बंगाल सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.