पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने नामांतराची परंपरा कायम ठेवली आहे. सरकारने आता अंदमान निकोबार बेटाची राजधानी आणि प्रशासकीय ठिकाण असलेल्या पोर्ट ब्लेअरचेही नाव बदलले आहे. पोर्ट ब्लेअरला आता "श्री विजया पुरम" या नावाने ओळखले जाणार आहे. या संदर्भातील घोषणा स्वत: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आज (दि.१३ सप्टें) एक्स अकाऊंटवरील पोस्टमधून केली आहे.
केंद्र सरकारने अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून श्री विजया पुरम असे केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली. त्यानंतर अमित शहा यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतीकांपासून मुक्त करण्याच्या संकल्पाने प्रेरित होऊन आज गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव 'श्री विजयपुरम' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीचे नाव वसाहतवादी वारसा सांगतो, तर श्री विजया पुरम हे नाव मिळालेल्या विजयाचे प्रतीक आहे. ‘श्री विजयपुरम’ हे नाव आपला स्वातंत्र्यलढा आणि त्यात अंदमान निकोबारचे योगदान दर्शवते, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
गृहमंत्र्यांनी पुढे लिहिले की, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि इतिहासात या बेटाचे अनन्यसाधारण स्थान आहे. चोल साम्राज्यात नौदल तळाची भूमिका बजावणारे हे बेट आज देशाच्या सुरक्षा आणि विकासाला गती देण्यासाठी सज्ज झाले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी तिरंगा फडकावल्यापासून ते सेल्युलर जेलमध्ये वीर सावरकर आणि इतर स्वातंत्र्यसैनिकांनी भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या लढ्यापर्यंतचे ठिकाणही हे बेट आहे.