File Photo
राष्ट्रीय

Ethanol Production Govt New policy : इथेनॉलसाठी ऊस, साखर वापरावर केंद्राची पूर्ण बंदी, तेल कंपन्यांना नवीन निविदा जारी करण्याचे निर्देश

साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पाऊल; वर्षभरासाठी निर्बंध

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशांतर्गत बाजारात साखरेच्या किरकोळ किमती स्थिर ठेवण्यासाठी आणि साखरेच्या संभाव्य तुटवड्याला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने मोठा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आगामी इथेनॉल पुरवठा वर्ष २०२६-२७ साठी उसाचा रस, थेट साखर, शुगर सिरप आणि बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीवर पूर्ण बंदी घातली आहे. तेल विपणन कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या निविदेमध्ये या घटकांपासून बनवलेल्या इथेनॉलच्या खरेदीवर शून्य मर्यादा लागू करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तेल कंपन्यांनी नोव्हेंबर २०२६ ते ऑक्टोबर २०२७ या कालावधीसाठी तब्बल १,१०० कोटी लिटर इथेनॉल खरेदीची निविदा काढली आहे. हा पुरवठा चार तिमाहीत विभागण्यात आला आहे. पहिली तिमाही (नोव्हेंबर २०२६ - जानेवारी २०२७) : ३०० कोटी लिटर; दुसरी तिमाही (फेब्रुवारी २०२७ - एप्रिल २०२७) : ३०० कोटी लिटर; तिसरी तिमाही (मे २०२७ - जुलै २०२७) : २५० कोटी लिटर, चौथी तिमाही (ऑगस्ट २०२७ - ऑक्टोबर २०२७) : २५० कोटी लिटर

पर्यायी घटकांपासून इथेनॉल निर्मितीवर भर

साखरेचा वापर थांबवण्यात आल्यामुळे केंद्र सरकारने पर्यायी घटकांवर भर दिला आहे. राष्ट्रीय जैवइंधन धोरणानुसार आता खालील घटकांपासून बनवलेले इथेनॉल स्वीकारले जाईल. सी हेवी मळी प्रति लिटर ₹५७.९७ दर निश्चित करण्यात आला आहे. खराब झालेले अन्नधान्य प्रति लिटर ६४ रुपये दर मिळेल. एफसीआयचा अतिरिक्त तांदूळ प्रति लिटर ६०.३२ रु. दर दिला जाईल. मक्यापासून उत्पादित इथेनॉलसाठी ६६.०७ रु. मूळ दर आणि जीएसटी वगळून २.७९ रु. प्रति लिटर अतिरिक्त प्रोत्साहन भत्ता दिला जाईल. याशिवाय साखर बीट, गोड ज्वारी, कसावा, सडलेले बटाटे आणि अन्न प्रक्रिया उद्योगातील टाकाऊ घटकांपासून मिळणाऱ्या इथेनॉललाही निविदेत स्वतंत्र वर्गवारी देण्यात आली आहे.

साखरेच्या उत्पादनातील घट कारणीभूत

साखर हंगाम २०२५-२६ मध्ये देशातील एकूण साखर उत्पादन ३१० लाख टन राहण्याचा अंदाज होता; तर सध्याच्या चालू हंगामात ते सुमारे २८० लाख टनांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी २०२६-२७ हंगामासाठीचे अधिकृत सरकारी अंदाज पुढील महिन्यात जाहीर होणार असले तरी, उत्पादन कमी राहण्याच्या शक्यतेमुळे सरकारने आधीच सावधगिरी बाळगून साखरेचा इतर कामांसाठी वापर रोखला आहे.

१) साखरेचे घटते उत्पादन आणि देशांतर्गत वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इथेनॉलसाठी साखरेचा वापर पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

२) आगामी २०२६-२७ या वर्षासाठी तेल विपणन कंपन्यांनी एकूण १,१०० कोटी लिटर इथेनॉल खरेदीसाठी नवी निविदा जाहीर केली आहे.

३) साखरेऐवजी आता सी हेवी मळी, मका, खराब झालेले अन्नधान्य आणि अतिरिक्त तांदळापासून बनवलेल्या इथेनॉलला प्राधान्य दिले जाईल.

४) मक्यापासून तयार होणाऱ्या इथेनॉलला सर्वाधिक प्रति लिटर ६६.०७ रु. दर आणि २.७९ रु. अतिरिक्त प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.

महत्त्‍वाचे मुद्दे

* एक क्विंटल शुद्ध साखरेपासून ६५ ते ६८.२ लिटर इथेनॉल तयार होऊ शकते.

* प्रत्यक्ष कार्यक्षमता : कारखान्यातील किण्वन (फर्मेंटेशन) व ऊर्ध्वपातन (डिस्‍टिलेशन) प्रक्रियेच्या कार्यक्षमतेनुसार (९० ते ९५ %) प्रत्यक्षात मिळणारे प्रमाण ६० ते ६५ लिटरच्या आसपास असू शकते.

• उसाशी तुलना : थेट उसाच्या रसापासून इथेनॉल बनवले तर १ टन (एक हजार किलो) उसापासून ७० ते ८४ लिटर इथेनॉल मिळते (म्हणजे १ क्विंटल उसापासून ७ ते ८.४ लिटर).

* तयार साखरेपासून थेट इथेनॉल जास्त प्रमाणात मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT