नवी दिल्ली : केंद्र सरकार पंजाबमधील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. धान्य खरेदीसह अनेक मागण्यांसाठी पंजाबमधील शेतकऱ्यांनी रविवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू ठेवल्याने केंद्रीय मंत्र्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य आहे. मी तुम्हाला (शेतकऱ्यांना) आश्वासन देऊ इच्छितो की आम्ही तुमच्याकडून धान्य खरेदी करू. ते म्हणाले की, जेव्हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान माझ्याकडे आले, तेव्हा मी भारतीय अन्न महामंडळाला (एफसीआय) निर्देश दिले की, जर त्यांना वाटप केलेल्या गोदामात जागा नसेल, तर एफसीआयने तात्काळ वाहतूक ताब्यात घ्यावी. २०१३-१४ मध्ये, ए ग्रेड धानासाठी किमान आधारभूत किंमत १ हजार ३४५ रुपये होती, सामान्य ग्रेडसाठी किंमत १ हजार ३१० रुपये होती. आज ही किंमत २ हजार ३०० रुपये झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री भगवंत मान यांना खरेदी वाढवण्याची विनंती केली आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्या (केंद्राच्या) वचनबद्धतेची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.