नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केले आहे. त्यासाठी गरज पडल्यास सरकारने आंतरराष्ट्रीय सहकार्यही घ्यायला हवे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांनी बांगलादेशात हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करताना हे निवेदन प्रसिद्ध केले आहे.
संघ सरकार्यवाह होसाबळे म्हणाले की, बांगलादेशातील इस्लामिक कट्टरवाद्यांकडून महिलांवर होणारे अत्याचार, हिंदूच्या हत्या, लूट, जाळपोळ आणि अमानुष अत्याचार अत्यंत चिंताजनक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचा निषेध करतो. सध्याचे बांगलादेश सरकार आणि इतर यंत्रणा हिंसाचार थांबवण्याऐवजी मौन बाळगून आहेत.
हिंदूंच्या आत्मसंरक्षणासाठी लोकशाही मार्गाने उठलेला आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांच्यावर अन्याय आणि अत्याचार करण्यात आल्याचे दिसले. हिंदूंच्या शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करणारे इस्कॉनचे संत चिन्मय कृष्ण दास यांना तुरुंगात डांबणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार त्वरित थांबवावेत आणि चिन्मय कृष्ण दासची तुरुंगातून सुटका करावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बांगलादेश सरकारला केली आहे.
बांगलादेशातील हिंदू आणि इतर सर्व अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू ठेवावेत आणि त्याच्या समर्थनार्थ जागतिक जनमत तयार करण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक पावले उचलावीत, असे आवाहनही संघटनेने केले आहे. या नाजूक वेळी भारत आणि जागतिक समुदाय आणि संघटनांनी बांगलादेशातील पीडितांच्या पाठीशी उभे राहून पाठिंबा दिला पाहिजे, असे ते म्हणाले.