नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
सीबीएसईचे बारावीचे महत्वपूर्ण विषयांचे पेपर कमी कालावधीसाठी घेण्याच्या प्रस्तावाला अनेक राज्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. तीनऐवजी दीड तासांच्या कालावधीला अनेक राज्ये तयार असून याबाबत आगामी बैठकीत निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती सोमवारी सूत्रांनी दिली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन सध्या सुरू आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महत्वाचे पेपर्सच घेतले जावेत आणि तेही तीनऐवजी दीड तासांचे घेतले जावेत, असा प्रस्ताव चर्चेला आला होता. या प्रस्तावाला अनेक राज्यांनी सहमती दर्शवली आहे. एकूण 19 महत्वपूर्ण विषयांचे पेपर्स घेतले जाणार असून त्यात बहुवैकल्पिक प्रश्न विचारले जाणार आहेत.
सीबीएससीची बारावीची परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्याचे नियोजन आहे. सीबीएससीची परीक्षा घेण्यास अनेक राज्यांनी अनुकूलता दाखवली आहे, मात्र याला दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन राज्यांचा अपवाद आहे. परीक्षा घेण्याबाबतचा अंतिम निर्णय 1 जूनपूर्वी घेतला जाणार आहे. परीक्षा घेण्याचाच निर्णय झाला तर ती 15 जुलै ते 26 ऑगस्टपर्यंत घेण्यावरही चर्चा सुरू आहे.