CBSE  file photo
राष्ट्रीय

CBSE : आता नववी आणि अकरावीमध्ये निवडलेले विषय दोन वर्षे शिकल्याशिवाय बोर्ड परीक्षा नाही

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने बोर्ड परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आहेत.

मोहन कारंडे

CBSE

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बोर्ड परीक्षा पद्धतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. आता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा दोन वर्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील. म्हणजेच, कोणत्याही विषयाची बोर्ड परीक्षा द्यायची असल्यास विद्यार्थ्यांना तो विषय सलग दोन वर्षे शिकणे बंधनकारक असेल.

दोन वर्षांचा अभ्यासक्रम कसा असेल?

सीबीएसईच्या या नव्या नियमामुळे, नववीत विद्यार्थ्यांनी निवडलेले विषय दहावीतही शिकणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याने नववीमध्ये 'फॅशन डिझाइनिंग' किंवा 'पेंटिंग'सारखे पर्यायी विषय निवडले असतील, तर त्याला तेच विषय दहावीमध्येही कायम ठेवावे लागतील. दहावीत हे विषय बदलता येणार नाहीत. हाच नियम अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीही लागू राहील.

शिक्षण धोरण-२०२० नुसार बदल

सीबीएसईचे परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी सांगितले की, हे बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार करण्यात आले आहेत. याचा उद्देश शिक्षण पद्धती अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवणे आहे.

उपस्थिती आणि अंतर्गत मूल्यमापन महत्त्वाचे

या नवीन नियमांव्यतिरिक्त, बोर्ड परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना किमान ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य असेल. तसेच सर्व विषयांचे अंतर्गत मूल्यमापन करणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आवश्यक आहे. जर विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिल्यास, त्याचे अंतर्गत मूल्यमापन होणार नाही आणि त्याचा निकालही घोषित केला जाणार नाही.

या नियमांचे पालन न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक पुनरावृत्ती श्रेणीमध्ये ठेवले जाईल. सीबीएसईने सर्व शाळांना इशारा दिला आहे की, बोर्डाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही नवीन विषय सुरू करू नये. यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शाळांनी अधिक खबरदारी बाळगणे महत्त्वाचे आहे. या निर्णयामुळे आता विद्यार्थ्यांना नववी आणि अकरावीमध्ये विषय निवडताना अधिक विचार करावा लागेल, कारण एकदा निवडलेले विषय पुढील दोन वर्षे कायम राहणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT