राष्ट्रीय

नवी दिल्ली: दहा किलो सोन्याच्या ‘त्या’ नाण्याचा तपास सीबीआयकडे

मोनिका क्षीरसागर

नवी दिल्ली;वृत्तसंस्था: घोटाळे, खून, अपहरण, बलात्कार अशा गुन्ह्यांचा तपास अनेकदा सीबीआयकडे सोपविला जाताना आपण बघतो. पण सरकारने 126 कोटी रुपये (1987 मध्ये) मूल्य असलेल्या एका नाण्याच्या तपासाची जबाबदारी सीबीआयवर सोपविली आहे. हे नाणे 400 वर्षांपूर्वीचे असून, त्याचे वजन 12 किलो आहे… आणि अर्थातच ते सोन्याचे आहे.

सर्वांत शेवटी 1987 मध्ये हैदराबादचा निजाम मुकर्रम याच्याकडे हे नाणे बघण्यात आले होते. नंतर स्वित्झर्लंडमध्ये या नाण्याच्या लिलावाची बातमी आली. तेव्हापासून नाण्याचा अत्तापत्ता नाही. बादशहा जहांगीर याच्या तुजुक-एजहांगिरी या आत्मकथेत या नाण्याचा उल्लेख आहे. इराणी शहाच्या राजदुताला जहांगीर याने 10 एप्रिल 1612 रोजी भेट म्हणून हे नाणे दिले होते. हे नाणे मग हैदराबादच्या निजामाकडे कसे आले? त्याचाही शोध सीबीआय घेत आहे.

एका दस्तावेजानुसार अशी दोन नाणी जहांगीरकडे होती. ईश्‍वरदास नागर यांच्या 'फतुहतए-आलमगिरी'नुसार 1695 मध्ये युद्धातील एका कामगिरीवर खुश होऊन बादशहा औरंगजेब याने गाझीउद्दीन खान बहादूर फिरोज जंग याला 12 किलो वजनी सोन्याचे हे नाणे भेट म्हणून दिले. गाझीउद्दीनकडून ते त्याचा मुलगा तसेच हैदराबादचा पहिला निजाम-उल-मुल्क आसफ जाह प्रथम याच्यापर्यंत पोहोचले. शेवटचा निजाम मीर उस्मान अली खानकडून त्याचा वंशज मुकर्रम जाहकडे ते नाणे आले.

पुढे 1987 मध्ये स्वित्झर्लंडच्या जीनिव्हातील हॉटेल मोगामध्ये हब्सबर्ग फिल्डमॅन हा 12 किलोचे सोन्याचे नाणे एका लिलावात विकणार असल्याचे भारत सरकारला कळले, तसे सीबीआयचे अधिकारी स्वित्झर्लंडला रवाना झाले होते. सीबीआयच्या हाती नाणे तर लागले नाही, पण मुकर्रम जाह स्वत: हे नाणे विकण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासातून समोर आले. 37 वर्षांपूर्वी हे नाणे शोधण्यात सीबीआयला यश आले नव्हते. आता सरकारने पुन्हा नव्याने ही जबाबदारी सीबीआयवर सोपविली आहे. बघूया काय होते ते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT