CBI Files Case in NEET Paper Leak
नीट यूजी मधील अनियमिततेबाबत सीबीआयने एफआयआर नोंदवला आहे. Pudhari News Network
राष्ट्रीय

NEET-UG Row : नीट पेपर फुटीप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क: नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. नीट यूजी (NEET-UG) मधील अनियमिततेबाबत सीबीआयने (CBI) एफआयआर (FIR) नोंदवला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. यापूर्वी बिहार पोलिसांनी या प्रकरणी काही लोकांना अटकही केली होती. तर दुसरीकडे नीट पेपर लीकचे कनेक्शन महाराष्ट्रातही आढळले आहे. पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांची चौकशी केली आहे. चौकशी केलेल्या शिक्षकांना नांदेडच्या दहशतवादी विरोधी पथकाने संशयाच्या आधारे ताब्यात घेतले आहे.

Summary

  • नीट पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात खळबळ

  • नीट पेपर लीकचे कनेक्शन महाराष्ट्रात

  • पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी दोन शिक्षकांची चौकशी

  • नीट यूजी (NEET-UG) मधील अनियमिततेबाबत सीबीआयने (CBI) एफआयआर

पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविला

नीट पेपर लीक झाल्याचा आरोप विरोधी पक्ष आणि सामाजिक संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पेपर लीक प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. बिहार पोलिसांनी या प्रकरणी ४ जणांना अटक केली आहे. त्यांनी परीक्षेच्या एक दिवस आधी पेपर फुटल्याची चौकशीत कबुली दिली आहे. पोलिस आता सॉल्व्हर गँगच्या लोकांचीही चौकशी करत आहेत.

एनटीए प्रमुखही बदलले

अनियमिततेच्या तक्रारींनंतर, केंद्र सरकारने नीट आणि यूजीसी नेट (UGC NET) यासह अनेक महत्त्वाच्या परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे (NTA) प्रमुख देखील बदलले आहेत. तसेच, एक पॅनेल तयार करण्यात आले आहे, जे नीट परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करेल.

5 मे रोजी झालेल्या नीट परीक्षेत सुमारे २४ लाख विद्यार्थी बसले होते. परंतु ४ जून रोजी निकाल जाहीर होताच आणि १५०० हून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. यानंतर एनटीएने विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस गुण काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. १५०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी नीट युजी परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. याशिवाय कथित पेपर लीक प्रकरणावरही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.

SCROLL FOR NEXT