नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने १ ऑक्टोबर २०३० पासून सर्व नवीन कार मॉडेल्ससाठी 'ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम' (एईबीएस) अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या तारखेपूर्वी उत्पादनात असलेल्या मॉडेल्सना एक ऑक्टोबर २०३२ पासून या नियमांचे पालन करावे लागेल.
सरकारने मध्यम आणि जड वाहनांची सुरक्षा सुधारण्यासाठी, त्यांच्या ब्रेकिंग कार्यक्षमतेवर लक्ष केंद्रित करून उपाययोजना जाहीर केल्या आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, १ ऑक्टोबर २०२७ पासून ट्रकसाठी ‘इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सिस्टीम’ अनिवार्य असेल.
‘एईबीएस’ कसे काम करते?
वाहन सुरू असताना ‘एईबीएस’ प्रणाली सतत कार्यरत असते.
यात रडार सेन्सर्स, कॅमेरे किंवा ‘लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.
हे उपकरण सहसा पुढच्या बंपरजवळ किंवा विंडस्क्रीनजवळ बसवलेले असते. याद्वारे अडथळ्यांचे अंतर, त्यांचा सापेक्ष वेग आणि टक्कर होण्यापूर्वीची वेळ मोजली जाते.
अडथळा वेगाने जवळ येऊन टक्कर होण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा ती दृश्य आणि श्राव्य सूचना देऊन चालकाला ब्रेकसाठी सूचित करते.
चालकाने प्रतिसाद न दिल्यास प्रणाली चेतावणी म्हणून अचानक थोड्या काळासाठी ब्रेक लावते.
टक्कर अटळ असेल, तर ‘एईबीएस’ पूर्ण क्षमतेने ब्रेक लावते.