भोपाळ : मध्य प्रदेशात दिवाळीचा उत्सव दुःखद ठरला, जेव्हा सुमारे 300 लोकांना (ज्यात मुलांचाही समावेश आहे) सोमवारी आणि मंगळवारी कार्बाईड गन किंवा कृषी तोफा चालवल्यामुळे डोळ्यांना गंभीर ते किरकोळ इजा झाली. या तोफा शेतकरी प्रामुख्याने माकडे आणि पक्ष्यांना पळवण्यासाठी वापरतात. जखमींपैकी 30 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांची द़ृष्टी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एम्स-भोपाळमधील डॉक्टरांच्या मते, डोळ्यांना प्रामुख्याने दोन प्रकारच्या इजा होतात - अॅसिड आणि अल्कली. अॅसिडमुळे होणार्या इजा कमी तीव्र असतात, कारण त्या डोळ्यात जास्त खोलवर जात नाहीत, याउलट अल्कलीमुळे होणार्या इजा अत्यंत धोकादायक असतात.
‘अल्कलीमुळे डोळ्यांना होणारे नुकसान अपरिवर्तनीय असते आणि उपचारांचा मुख्य उद्देश पुढील हानी टाळणे हा असतो. काही प्रकरणांमध्ये, द़ृष्टी पूर्णपणे जाऊ शकते. एम्स-भोपाळमध्ये दाखल झालेल्या रुग्णांपैकी फक्त एका रुग्णाच्या दोन्ही डोळ्यांना इजा झाली आहे,’ अशी माहिती एम्स-भोपाळच्या नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. भावना शर्मा यांनी दिली.
कार्बाइड गनमध्ये कॅल्शियम कार्बाईड काडेपेटीच्या काड्यांची टोके आणि बंदुकीची दारू यांचे मिश्रण असते. कॅल्शियम कार्बाइडमध्ये पाणी मिसळल्यावर ऍसिटिलीन वायू तयार होतो, आणि तो पेटवल्यावर एक शक्तिशाली स्फोट होतो. या स्फोटातून प्रचंड उष्णता, विषारी वायू आणि घातक कण बाहेर पडतात. अधिकार्यांनी सांगितले की, पीव्हीसी मंकी रिपेलर गन म्हणून ऑनलाईन विकल्या जाणार्या या कार्बाइड गन पारंपरिक फटाक्यांना पर्याय म्हणून उदयास आल्या.
निर्बंध असूनही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर कार्बाईडवर आधारित तोफांची विक्री सुरूच होती. ही उत्पादने धातू किंवा पीव्हीसी पाईपच्या स्वरूपात उपलब्ध आहेत आणि स्वतः तयार करण्याच्या संचाच्या रूपात किंवा वापरण्यासाठी तयार युनिटस् म्हणून विकली जात आहेत. विक्रेते यासोबत प्रज्वलन यंत्रणा आणि संरक्षक हातमोजे यांसारख्या अतिरिक्त वस्तू देतात, ज्यामुळे सुरक्षिततेचा आणि कायदेशीरपणाचा खोटा आभास निर्माण होतो.