नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळी झालेल्या शक्तिशाली स्फोटाने हादरली. लाल किल्ल्यासमोरील एका कारमध्ये झालेल्या या स्फोटात किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. 20 जण जखमी झाले आहेत. कारमध्ये भीषण स्फोट होताच लागलेल्या आगीत आजूबाजूची सुमारे 30 वर वाहने जळून खाक झाली. मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या. घटनास्थळावर रक्तमांसाचा चिखल झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, या भयंकर घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. दिल्ली, गुरुग्रामसह देशभर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत अतिदक्षतेचे आदेश देण्यात आले असून, कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या स्फोटात 9 जणांना प्राणास मुकावे लागले असून, सर्व शक्यता तपासल्या जात असल्याचे सांगितले.
स्फोटाचे वृत्त कळताच अग्निशमन दल, पोलिस, एनआयए पथक, फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. लाल किल्ला परिसरात संध्याकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी असते. शेजारीच मेट्रो स्टेशन असल्यामुळे मोठी वर्दळ असते. सोमवारी संध्याकाळीही अशीच स्थिती असताना लाल किल्ला मेट्रो स्टेशनसमोरील एका सिग्नलजवळ वेग कमी करत आलेल्या आय-20 कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागल्यामुळे पळापळ सुरू झाली. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, लाल किल्ल्याजवळ असलेल्या लाल मंदिरावर कारचा एक भाग येऊन आदळला. त्यात मंदिराची काच फुटली. आजूबाजूच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्यांनाही हानी पोहोचली. स्फोट इतका शक्तिशाली होता की, चांदणी चौकाच्या भागीरथ पॅलेस परिसरापर्यंत त्याचे हादरे जाणवले. पाठोपाठ काही वाहनांनाही आग लागली. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब, दिल्ली पोलिस, एनआयए आणि फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. पोलिसांनी परिसर सील केला आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांनी परिसर ताब्यात घेतला आहे. अन्य सुरक्षा यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्या. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार, स्फोट कारमध्ये झाला. मात्र, त्याचे स्वरूप समजले नव्हते. लाल किल्ला आणि चांदणी चौक परिसरात प्रचंड सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.
लोकनायक हॉस्पिटलमध्ये गर्दी
स्फोटातील जखमींना लोकनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येत आहे. शिवाय, मृतदेहही तेथेच ठेवण्यात आल्याने या परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे. येथेही मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या घटनेत 20 जण जखमी झाले आहेत. सहाजणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
मृतदेहाचे तुकडे विखुरले; रक्तमांसाचा चिखल झाला!
घटनास्थळी एका मृतदेहाचे तुकडे इतस्ततः विखुरले; रक्तमांसाचा चिखल झाला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एक स्थानिक दुकानदार म्हणाले की, मी माझ्या दुकानात खुर्चीवर बसलो होतो. अचानक जोरात आवाज आला. हा आवाज इतका प्रचंड होता की, मी बसल्या जागेवरून खाली पडलो. त्यानंतर स्वतःला कसाबसा सावरून भीतीने लांब पळालो. माझ्यासह अवतीभोवतीचे लोकही पळू लागले. अन्य एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, मी टेरेसवर होतो. अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणात मोठी आग बघितली. स्फोट इतका भीषण होता की, आमच्या घराच्या अनेक काचा फुटल्या.
सिग्नलवर गाडी थांबली, ड्रायव्हर उतरला अन् भीषण स्फोट झाला!
राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. हळुवार येऊन सिग्नलवर थांबलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. दिल्लीचे पोलिस आयुक्त सतीश गोलचा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी सुमारे 6 वाजून 52 मिनिटांनी कमी वेगानेे चाललेली गाडी रेड सिग्नलवर थांबली, त्यातून ड्रायव्हर खाली उतरला अन् त्याचवेळी गाडीत शक्तिशाली स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की, आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर गाड्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
सर्व शक्यतांचा विचार; सर्व बाजूंनी सखोल तपास : गृहमंत्री अमित शहा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने माहिती घेतली असून, ते स्वतः घटनास्थळी गेले. तत्पूर्वी, त्यांनी लोकनायक हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची माहिती घेतली. ते म्हणाले, मी दिल्लीचे पोलिस आयुक्त आणि विशेष शाखेच्या प्रमुखांशी बोललो असून, ते घटनास्थळी उपस्थित आहेत. आम्ही सर्व शक्यतांचा विचार करत असून, सर्व बाजूंनी सखोल तपास केला जाईल. घटनेची माहिती मिळताच 10 मिनिटांच्या आत दिल्ली क्राईम ब्रँच आणि दिल्ली स्पेशल ब्रँचची पथके घटनास्थळी दाखल झाली. आता एनएसजी आणि एनआयएच्या पथकांनी एफएसएलसोबत मिळून सखोल तपास सुरू केला आहे. परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही शहा यांनी स्पष्ट केले.
‘त्या’ कारमुळेच उलगडणार स्फोटाचे गूढ
राजधानी दिल्लीत सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटाला कारणीभूत ठरलेली ह्युंदाईची आय-20 ही कार हरियाणात नोंदणी झाली असून, तिचा क्रमांक एच.आर. 26 - 7674 असा आहे. ही कार नदीम खानच्या नावावर असून, तिचा मूळ मालक सलमान होता. सलमानने ही कार ओखला येथील देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली होती, असे पोलिसांनी सांगितले. आता यासंदर्भात आणखी चौकशीसाठी सुरक्षा यंत्रणांची पथके हरियाणाला रवाना झाली आहेत.कारण, या कारच्या मालकाचा छडा लागल्यानंतरच या स्फोटामागील गूढ उलगडणार आहे.
उत्तर प्रदेशातील अशोक यांचा मृत्यू
दिल्ली स्फोटात उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील हसनपूरचे रहिवासी अशोक कुमार यांचा मृत्यू झाला. देवरिया येथील रहिवासी शिवा जैस्वाल, आग्रा येथील पप्पू आणि गाझियाबाद येथील मोहम्मद दाऊद हेदेखील जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांकडून घेतली माहिती
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडूून परिस्थितीची माहिती घेतली. गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलिस आयुक्तांबरोबर चर्चा केली. शिवाय, ते गुप्तचर विभागाच्या संचालकांकडून सातत्याने माहिती घेत आहेत.
देशभरात हायअलर्ट; महाराष्ट्रासह अनेक राज्यांत सुरक्षा कडक
दिल्लीत झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश हरियाणा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. राजधानी दिल्लीत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले असून, अनेक राज्यांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा, केरळ या राज्यांसह केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्येही सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, कसून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीतील स्फोटानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी देशातील प्रमुख राज्यांनी तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे स्थानके, बस स्थानके, बाजारपेठा आणि इतर गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवली जात आहे.