पुढारी ऑनलाईन डेस्क : लग्न समारंभासाठी जात असताना उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील भुजौली शुक्ला गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने झाडाला धडकून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील एकासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. रविवारी रात्री पडरौना पानीहवा रस्त्यावर हा अपघात झाला.
अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक लोकांनी गॅस कटरच्या मदतीने गाडी कापली आणि मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. मृतांमध्ये कार चालकासह पाच जणांची ओळख पटली आहे. त्यामध्ये भीम लक्ष्मण यादव (वय २३) हा महाराष्ट्रातील श्रीनगर गावातील रहिवासी तर बाकीचे सर्वजण नारायणपूर चारघन येथील रहिवासी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, नारायणपूर चाराघनच्या पश्चिम टोला येथील गोपाळ मधेशिया यांचा मुलगा विकास याची लग्नाची वरात नेबुआ नौरंगियाच्या देवगावला होती. खड्डा-पदरौना रस्त्यावरील शुक्ला भुजौलीजवळ वरातीतील या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. अपघाताचा आवाज ऐकून लोक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. गॅस कटर मदतीने गाडी कापण्यात आली आणि आत अडकलेले मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तिघांना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. दोन जखमींना गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.