Captain Smit Tells PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मछार यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी स्मित यांच्या धैर्याचे, प्रसंगावधानाचे आणि कठीण परिस्थितीतही संयम दाखवल्याबद्दल कौतुक केले. या संवादात कॅप्टन स्मित यांनी त्या कठीण प्रसंगातील अनुभव सांगताना आपण विमानात हनुमान चालीसा वाचत होतो आणि कोणालाही मरू द्यायचं नाही, हाच विचार मनात होता, असे सांगितले.
पंतप्रधान मोदींशी बोलताना कॅप्टन स्मित भावूक झाले. पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळेल, असा विचारही आपण कधी केला नव्हता, असे त्यांनी सांगितले. मोदींशी झालेला हा संवाद आपल्या आयुष्यातील अत्यंत खास क्षण असल्याचेही स्मित यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपले सर्वात मोठे आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कॅप्टन स्मित यांच्या धैर्याचे कौतुक केले. “संपूर्ण देश स्मितसाठी प्रार्थना करत आहे,” असे मोदी यांनी सांगितले. भारतीय लोक इतरांचे प्राण घेणारे नाहीत, तर गरज पडल्यास इतरांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे आहेत, असेही पंतप्रधानांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांनी स्मित यांच्या आई गीता बेन यांचाही उल्लेख केला. भगवद्गीतेतील शिकवण आणि चांगल्या संस्कारांनी त्यांनी स्मित यांना घडवल्याचे मोदी यांनी सांगितले.
कॅप्टन स्मित यांनी सांगितले की, जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असतो, तेव्हा हनुमान चालीसाचे पठण करतो. त्या कठीण प्रसंगातही आपण विमानात हनुमान चालीसा वाचत होतो. मात्र त्यावेळी मनात स्वतःच्या जीवापेक्षा इतर प्रवाशांचा विचार होता. “कोणालाही मरू द्यायचं नाही,” हा एकच विचार मनात होता, असे स्मित यांनी सांगितले.
या संवादातून कॅप्टन स्मित यांच्या धैर्यासोबतच संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेला संयम आणि इतरांच्या जीवाची काळजी दिसत होती. शेवटी पंतप्रधान मोदी यांनी स्मित यांच्या धैर्याचे आणि प्रसंगावधानाचे कौतुक करत संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचे म्हटले.