पुढारी ऑनलाईन डेस्क: Delhi Budget 2025 | राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आज (दि.२५) विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "दिल्लीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला जात आहे. दिल्लीचे बजेट १ लाख कोटी रुपये आहे. जे गेल्या वेळेपेक्षा खूपच जास्त आहे. तसेच१ लाख कोटी रुपयांचे ऐतिहासिक बजेट पुढे दुप्पट केले जाईल, या अर्थसंकल्पातून सर्वांचा विकास होईल, असेही मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मागील सरकारवर निशाणा साधताना म्हटले आहे की, मागील सरकारने दिल्लीतील जनतेचा विश्वासघात झाला आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी जनतेला केवळ स्वप्ने दाखवली आणि दिल्लीला पोकळ केले. दारू माफिया आणि पीडब्ल्यूडी कंत्राटदारांना पैसे मिळत असल्याने सरकारचे उत्पन्न कमी झाले. त्यामुळेच दिल्ली विकासात मागे पडली आहे, अशी टीका देखील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केजरीवाल सरकारवर केली आहे.
दिल्लीच्या विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसंदर्भातही मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात ५ हजारांहून अधिक कॅमेरे बसवले जातील. रस्ते आणि पुलांच्या पायाभूत सुविधांसाठी ३८४३ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत. झोपडपट्ट्या आणि जेजे वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ६९६ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत".
यमुना सांडपाणी आणि प्रदूषित पाण्याशी झुंजत आहे. यमुनेची स्वच्छता ही आमची प्राथमिकता आहे. आम्ही यमुना नदी स्वच्छ करण्यासाठी वचनबद्ध आहोत. ती आमच्यासाठी फक्त एक नदी नाही; ती आमची सांस्कृतिक वारसा आहे. ४० विकेंद्रित सांडपाणी संयंत्रे विकसित करण्यासाठी ५०० कोटी रुपये वाटप करण्यात आले आहेत, जेणेकरून कोणतेही सांडपाणी थेट यमुना नदीत सोडले जाऊ नये...", असेही मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या.
मागील सरकारने लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेऊ दिला नाही. आता तुम्हाला आमच्या सरकारमध्ये फायदे मिळतील. २० कोटी रुपये देण्यात आले आहेत. आमदार निधी पूर्णपणे उपलब्ध असेल. कोणतीही कपात केली जाणार नाही. जेवण कागदावर होते, पण आम्ही ते जनतेला ताटात देऊ. दिल्लीत १०० कोटी रुपयांच्या निधीतून १०० ठिकाणी अटल कॅन्टीन उघडली जातील. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिल्लीत कॅन्टीन उघडण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या की,"तुम्ही तुमचा शीशमहाल बांधला आहे. आम्ही आमच्या जवळच्या लोकांसाठी घरे बांधू. आम्ही गरिबांसाठी शौचालये बांधू. तुम्ही जाहिरातींवर कराचे पैसे खर्च केले. निवडणुकीत पैसे गुंतवले. तुमच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे. आम्ही राजधानी दिल्लीतील कचरा साफ करू आणि कचऱ्याचे डोंगर लवकरच काढून टाकू".
मुख्यमंत्री गुप्ता म्हणाल्या, "व्यापाऱ्यांसाठी व्यापार कल्याण मंडळ स्थापन केले जाईल. दिल्लीत उद्योगांचा विकास झाला नाही. आम्ही लोकांना रोजगार देऊ. आमचे सरकार दिल्लीत एक नवीन औद्योगिक धोरण आणेल".
दिल्लीमध्ये गटार आणि पाण्यासारख्या समस्या आहेत. स्वच्छ पाण्यासाठी नऊ हजार कोटी रुपये वाटप केले जातील. पाण्याच्या टँकरमध्ये जीपीएस बसवले जाईल, असे देखील दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.