मुंबई : आरोग्य क्षेत्रासाठी पहिल्यांदाच केंद्रीय अर्थसंकल्पात 1 लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद करण्यात आली असून, कर्करोगावरील 17 महत्त्वाच्या औषधांवरील अतिरिक्त आयात शुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ही औषधे आता शुल्कमुक्त आयात होणार असून, रुग्णांवरील औषधांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होणार आहे.
कर्करोगावरील उपचारांसाठी साधारणतः 2 ते 25 लाख रुपये खर्च येतो. तर अत्याधुनिक इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीसाठी 50 लाखांपासून 1 कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो. आयात शुल्क माफ करण्यात आले असले तरी नेमकी किती किंमत कमी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याबाबत सविस्तर माहिती एप्रिल महिन्यानंतर याबाबत स्पष्टता येईल असे वैद्यकीय तज्जांचे मत आहे.
कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणार्या रिबोसिक्लिब, एबेमॅसिक्लिब, टॅलीकाबटेजीन ऑटोल्यूसेल, ट्रेमेलिम्युमॅब, व्हेनेटोक्लॅक्स, सेरिटिनिब, ब्रिगाटिनिब, डारोलुटॅमाईड, टोरिपॅलिमॅब, सेरप्लुलिमॅब, टिस्लेलिझुमॅब, इनोतुझुमॅब ओझोगॅमिसिन, पोनाटिनिब, इब्रुटिनिब, डाब्राफेनिब, ट्रामेटिनिब आणि इपिलिमुमॅब या औषधांचा समावेश आहे. ही औषधे विशिष्ट प्रकारच्या कर्करोगावर ठरावीक परिस्थितीत वापरली जातात.
महिलांमधील स्तन, रक्ताचा कर्करोग व फुफ्फुस कर्करोगासाठी या औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. स्तन कर्करोगाला लागणारी रिबोसिक्लिब व एबेमॅसिक्लिब, रक्ताच्या कर्करोगावर वापरले जाणारे व्हेनेटोक्लॅक्स यांसारखी औषधे या निर्णयामुळे स्वस्त होणार आहेत.
* 17 महत्त्वाच्या कर्करोगावरील औषधांवरील मूलभूत सीमा शुल्क माफ
* आयात शुल्कातून सूट मिळणार्या दुर्मीळ आजारांच्या यादीत 7 नवीन आजारांचा समावेश
* भारतात दरवर्षी 14 लाखांहून अधिक नवीन कर्करोग रुग्ण आढळतात
* अंदाजानुसार 2040 पर्यंत कर्करोग रुग्णसंख्या 20 लाखांपर्यंत पोहोचू शकते
* आरोग्यसेवा सुधारणांमुळे कर्करोगावरील औषधे अधिक परवडणारी होतील
* काही अँटिकॅन्सर औषधांच्या किमती 10 ते 20 टक्क्यांनी कमी होऊ शकतात