नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांना कथितपणे थप्पड मारल्यानंतर विमानतळ सुरक्षा अधिकारी कुलविंदर कौर यांचे निलंबन करून अटक करण्यात आली. दरम्यान, कौर यांनी शुक्रवारी एक्स पोस्ट करत, 'मला ही नोकरी गमावण्याची भीती वाटत नाही. माझ्या आईच्या सन्मानासाठी मी अशा हजारो नोकऱ्या गमावण्यास तयार आहे', अशी आक्रमक भूमिका मांडली आहे.
कंगना रनौतला चंदीगड विमानतळावर महिला सीआयएसएफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल) कॉन्स्टेबल कुलविंदर कौरने थप्पड मारली होती. यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिले आहे. कंगना आणि लेडी कॉन्स्टेबलमध्ये वादावादीही झाली. अभिनेत्रीला मारलेली थप्पड हे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उत्तर आहे, हे कंगनाने जारी केलेल्या व्हिडिओवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान या प्रकारानंतर काही तासातच कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आले. तसेच चौकशीचे आदेश देण्यात आले. शुक्रवारी सकाळी कौरला अटक करण्यात आली.
थप्पड मारण्याच्या घटनेवर कंगना म्हणाली, 'मी पूर्णपणे सुरक्षित आहे. चंदिगड विमानतळावर जे घडलं ते सुरक्षा तपासणीदरम्यान घडलं. चेक आऊटकरून मी बाहेर येत असताना दुसऱ्या केबिनमधून एक महिला गार्ड अचानक बाहेर आली आणि माझ्या तोंडावर चापट मारली. या प्रकारानंतर तिने शिवीगाळही केली. या प्रकारावर मी तिला जाब विचारला. तर त्या महिला गार्डने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगायला सुरुवात केली.'