Landlord rights File Photo
राष्ट्रीय

Landlord rights: घरमालक पूर्वसूचनेशिवाय तुमच्या भाड्याच्या घरात प्रवेश करू शकतो का? कायदा काय सांगतो?

घरमालक कायदेशीररित्या भाडेकरूच्या घरात पूर्वसूचनेशिवाय प्रवेश करू शकतात का? या अधिकाराचा कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे.

मोहन कारंडे

Landlord rights

नवी दिल्ली: भाड्याच्या घरात घरमालकाने पूर्वसूचना न देता अचानक प्रवेश करणे हा अनेक भाडेकरूंना भेडसावणारा प्रश्न आहे. मालमत्तेचा मालक असल्याने घरात केव्हाही जाण्याचा अधिकार आपल्याला आहे, असा दावा काही घरमालक करतात. मात्र, कायद्यानुसार मालकी हक्क म्हणजे भाड्याने दिलेल्या घरात अमर्याद प्रवेशाचा अधिकार नव्हे. भाडेकरूंच्या गोपनीयतेचा आणि शांततेने वास्तव्य करण्याच्या अधिकाराचाही कायद्यात स्पष्ट उल्लेख आहे.

एकदा का मालमत्ता भाड्याने दिली की, भाडेकरूंना गोपनीयतेचा आणि त्या जागेचा शांतपणे वापर करण्याचा अधिकार मिळतो आणि घरमालकांनी या अधिकारांचा आदर केला पाहिजे. भाडेकरू आणि घरमालक यांचे हक्क व जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यासाठी मॉडेल टेनन्सी अ‍ॅक्ट, २०२१ मध्ये विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत. या कायद्यातील कलम १७ नुसार, घरमालक किंवा मालमत्ता व्यवस्थापकाने भाड्याच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी किमान २४ तास आधी लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सूचना देणे बंधनकारक आहे.

या सूचनेमध्ये घरात प्रवेश करण्याचा दिवस, वेळ आणि कारण स्पष्टपणे नमूद केलेले असणे आवश्यक आहे. तसेच, सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर घरात प्रवेश करण्यास परवानगी नाही. सूचना दिल्यानंतरही घरमालकाला केवळ काही विशिष्ट कारणांसाठीच घरात प्रवेश करता येतो. यामध्ये घराची दुरुस्ती किंवा बदल करण्याची गरज, घर राहण्यायोग्य स्थितीत आहे का याची तपासणी करणे किंवा भाडेकरारात नमूद केलेल्या अन्य इतर कारणांचा समावेश होतो. मात्र, युद्ध, पूर, आग, चक्रीवादळ, भूकंप किंवा इतर नैसर्गिक आपत्तींसारख्या आपत्कालीन परिस्थितीत घरमालकाला पूर्वसूचना न देता भाड्याच्या घरात प्रवेश करण्याची मुभा आहे.

मात्र, मॉडेल टेनन्सी अ‍ॅक्ट, २०२१ हा केवळ मार्गदर्शक स्वरूपाचा कायदा असून, तो स्वीकारायचा की नाही, याचा निर्णय प्रत्येक राज्य सरकार घेऊ शकते. सध्या आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांनीच या कायद्याची अंमलबजावणी स्वीकारली आहे. त्यामुळे इतर राज्यांमध्ये भाडेकरू आणि घरमालकांवरील नियम संबंधित राज्यांच्या विद्यमान कायद्यांनुसार लागू होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT