Manmohan Singh | डॉ. मनमोहन सिंग यांचे केम्‍ब्रिज विद्यापीठात तैलचित्र 
राष्ट्रीय

Manmohan Singh | डॉ. मनमोहन सिंग यांचे केम्‍ब्रिज विद्यापीठात तैलचित्र

पुढारी वृत्तसेवा

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनमधील जगप्रसिद्ध केम्‍ब्रिज विद्यापीठाने भारताचे माजी दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या तैलचित्राचे अनावरण करून त्यांचा अनोखा सन्मान केला आहे. केम्‍ब्रिज विद्यापीठात अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांच्या चित्रांचे अनावरण होणे अत्यंत दुर्मीळ मानले जाते. या निर्णयामुळे विद्यापीठाने डॉ. सिंग यांच्या अद्वितीय बौद्धिक योगदानाला आणि जागतिक नेतृत्वाला मानवंदना दिली आहे.

भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांच्यासह अनेक दिग्गज अर्थतज्ज्ञांनी सोशल मीडियावर या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत केले. ‘केम्‍ब्रिजने मनमोहन सिंग यांच्या तैलचित्राचे अनावरण केल्याबद्दल मला अत्यंत आनंद झाला. ते जगातील सर्वाधिक आदरणीय नेत्यांपैकी एक होते,’ अशा शब्दांत बसू यांनी भावना व्यक्त केल्या. डॉ. सिंग यांच्यासोबत दीर्घकाळ काम केल्याचा उल्लेख करत ते म्हणाले की, ‘बुद्धिमत्ता, नम्रता आणि प्रामाणिकपणा यांचा असा दुर्मीळ संगम केवळ त्यांच्यातच होता, ज्यामुळे जागतिक पटलावर भारताला एक विशेष स्थान मिळाले.’

केम्‍ब्रिजच्या प्राध्यापिका श्रीया अय्यर यांनी डॉ. सिंग यांचा उल्लेख द्रष्टे अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी म्हणून केला. माहितीचा अधिकार, शिक्षण, रोजगार हमी आणि सामाजिक सहिष्णुतेचा डॉ. सिंग यांनी सातत्याने पुरस्कार केला.

केम्‍ब्रिजशी अतूट नाते

डॉ. मनमोहन सिंग यांनी केम्‍ब्रिज विद्यापीठाच्या अर्थशास्त्र शाखेतून उच्च शिक्षण घेतले होते. १९५७ मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात 'फर्स्ट क्लास ऑनर्स' पदवी मिळवली होती. विद्यार्थी असतानाच त्यांनी प्रतिष्ठेचा ‘ॲडम स्मिथ पुरस्कार’ पटकावला होता. केंब्रिजच्या सेंट जॉन्स कॉलेजचे ते मानद फेलो राहिले होते.

इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स

अखंड भारतातील पंजाब प्रांतात १९३२ मध्ये जन्मलेल्या डॉ. सिंग यांनी केम्‍ब्रिज नंतर १९६२ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून डी.फिल. पूर्ण केले. त्यांचे 'इंडियाज एक्सपोर्ट ट्रेंड्स' हे पुस्तक भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणातील मैलाचा दगड ठरले. केम्‍ब्रिजमधील हे तैलचित्र भारताच्या या महान सुपुत्राच्या जागतिक वारशाची सदैव आठवण करून देत राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT