Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात 12 मंत्र्यांमध्ये बदल होण्याची शक्यता; राज्यसभा निवडणुकांनंतर मोठ्या फेरबदलाचे संकेत file photo
राष्ट्रीय

Cabinet Reshuffle : मोदी मंत्रिमंडळात 12 मंत्र्यांमध्ये बदल होण्याची शक्यता; राज्यसभा निवडणुकांनंतर मोठ्या फेरबदलाचे संकेत

18 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा जोर धरत आहे.

पुढारी वृत्तसेवा

cabinet reshuffle likely around rajyasabha election results 2026

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 18 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एनडीए सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची चर्चा जोर धरत आहे. यावेळी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल होण्याची शक्यता असून जवळपास डझनभर मंत्र्यांवर याचा परिणाम होऊ शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

एका वृत्तानुसार, आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीत असलेली भाजप नेतृत्वातील सरकार मंत्रिमंडळाबाबत महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. सूत्रांच्या माहितीनुसार, किमान दोन कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्री मंत्रिपरिषदेतून बाहेर पडू शकतात. तसेच एका वरिष्ठ मंत्र्याला दक्षिण भारतातील एका राज्यात पक्षाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

मित्रपक्षांनाही मिळू शकते मंत्रिपदे

राजकीय चर्चेनुसार, नव्या मंत्रिमंडळ विस्तारात जनता दल (युनायटेड), तेलुगू देसम पक्ष (टीडीपी), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) आणि राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) यांसारख्या मित्रपक्षांना प्रतिनिधित्व मिळू शकते. विशेषतः नीतीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपी यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मित्रपक्षांच्या बहुतांश नेत्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते.

राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ आणि संघटनात्मक बदल

राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत असलेल्या काही मंत्र्यांना यंदा किंवा 2027 च्या सुरुवातीला पक्ष संघटनेत पाठवले जाऊ शकते. 70 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या काही राज्यसभा खासदारांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तसेच भाजपच्या विविध मोर्चांतील नेत्यांना प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.

या मंत्रालयांमध्ये बदल होण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार खालील मंत्रालयांमध्ये फेरबदल होऊ शकतात: रेल्वे, अर्थ (वित्त), कॉर्पोरेट व्यवहार, कोळसा, वस्त्रोद्योग, माहिती व प्रसारण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, रसायने व खते, सहकार, मत्स्यव्यवसाय, जलशक्ती, कृषी, पर्यावरण, कायदा व न्याय मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

18 जून रोजी राज्यसभा निवडणुका

18 जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकांमध्ये :

आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक –प्रत्येकी 4 जागा

मध्य प्रदेश आणि राजस्थान – प्रत्येकी 3 जागा

झारखंड – 2 जागा

मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम – प्रत्येकी 1 जागा

याशिवाय महाराष्ट्र आणि तामिळनाडू येथे राज्यसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.

एकूण 26 जागांसाठी निवडणूक आणि पोटनिवडणुका होत असून त्यापैकी 18 जागांवर एनडीएचे वर्चस्व आहे. या 18 जागांपैकी 12 जागा भाजपच्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT