गांधीनगर; वृत्तसंस्था : गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील व्यावसायिकाने आपल्या आईची अंतिम इच्छा पूर्ण करताना तब्बल 90 लाख रुपये दान करून गावातील सर्व शेतकर्यांना कर्जमुक्त केले आहे. शेतकर्यांना मोठा दिलासा दिल्याबद्दल या व्यावसायिकावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सावरकुंडला तालुक्यातील जिरा गावचे रहिवासी बाबूभाई जिरावाला यांनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त गावातील 290 शेतकर्यांचे गेल्या 30 वर्षांपासूनचे कर्ज फेडले. त्यांनी या कामासाठी 90 लाख रुपये दान केले. त्यांच्या मदतीने गावातील सर्व शेतकरी कर्जमुक्त झाले आहेत.
बाबूभाई जिरावाला यांनी सांगितले की, आमच्या गावात 1995 पासून जिरा सेवा सहकारी मंडळाबाबत एक मोठा वाद सुरू आहे. या समितीच्या तत्कालीन प्रशासकांनी शेतकर्यांच्या नावावर फसवे कर्जे काढली होती. गेल्या काही वर्षांत कर्जात प्रचंड वाढ झाली. त्यामुळे हे शेतकरी काळजीत पडले होते. कर्जाची रक्कम वाढत गेल्यामुळे शेतकर्यांना सरकारी मदत, कर्ज आणि इतर लाभांपासून वंचित ठेवण्यात आले होते. बँकांनी गावातील शेतकर्यांना कर्ज देण्यास नकार दिला आणि कर्जामुळे जमिनीचे विभाजन करणेही अशक्य बनले होते. या पार्श्वभूमीवर, माझ्या आईने गावातील शेतकर्यांचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःचे दागिने विकायची इच्छा प्रदर्शित केली होती.
शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडल्यामुळे मी या सर्वांना कर्जमुक्त करायचे ठरवले. त्यासाठी मी आणि माझा भाऊ बँक अधिकार्यांना भेटलो. त्यांच्याकडे आमची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात सहकार्य केले. गावातील शेतकर्यांवर एकूण 8,989,209 कर्ज होते. आम्ही ते कर्ज फेडले आणि बँकेकडून कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र मिळवले. नंतर ते सर्व शेतकर्यांना समारंभपूर्वक देण्यात आले. आईची इच्छा पूर्ण केल्याबद्दल आणि तिला या कर्जमुक्तीद्वारे खरी श्रद्धांजली वाहिल्याबद्दल मी आणि माझे कुटुंब आनंदी आहोत, असे जिरावाला यांनी नमूद केले.
सर्व 299 शेतकर्यांना ‘नो ड्यू सर्टिफिकेट’ देण्यात आले तेव्हा जिरा गावातील जवळपास प्रत्येक व्यक्ती भावनाविवश झाली होती. डोक्यावरील कर्जाचे ओझे दूर झाल्याने शेतकर्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी जिराभाईंना भरभरून आशीर्वाद दिले. संपत्तीचा वापर मानवतेसाठी केला जातो तेव्हा त्याचे मूल्य अब्जावधी रुपयांपेक्षा जास्त असते हे याद्वारे दिसून आले. बाबूभाईंनी त्यांच्या आईच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून जिरा गावातील 290 कुटुंबांना एक नवी सुरुवात करून दिली.