Crime News
आग्रा : येथील सैयां भागात पालिसांना अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने संपूर्ण आग्रा शहरात खळबळ माजली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले. मृतदेहाचा चेहरा जळाला होता त्यामुळे ओळख पटवणेही अशक्य झाले. मात्र स्थानिक पोलिसांनी आपले कौशल्य पणाला वात टॅटू आणि QR कोडच्या माध्यमातून आरोपींच्या मुसक्या आवळ्या पत्नीच्या अनैतिक संबंधातून हा गुन्हा घडल्याची धक्कादायक माहितीही पोलीस तपासात समोर आली.
१ एप्रिलच्या रात्री आग्राच्या 'सैयां' भागात अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. मृतदेहाची ओळख पटवणे हे एक मोठे आव्हान होते, कारण चेहरा इतका जळाला होता की तो ओळखणेच अशक्य झाले होते; मात्र, हाताच्या कोपराखालील भागावर एक टॅटू दिसला. त्यावर 'लोकेन्द्र' असे नाव कोरलेले होते. दुसऱ्या दिवशी, लोकेन्द्रच्या भावाने पोलिसांकडे लोकेन्द्र बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या तक्रारीत नमूद करण्यात आले होते की, लोकेन्द्र रात्री घरी परतला नाही आणि त्याला शेवटचे महेश प्रजापती याच्यासोबत पाहिले गेले होते.
या धक्कादायक खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी करण्यात आली. तपासाला पुढे नेण्यासाठी तांत्रिक पुराव्यांचा वापर करण्यात आला. घटनास्थळावरून पोलिसांनी दारूच्या बाटल्या आणि कागदाचे काही तुकडे जप्त केले होते. लोकेन्द्रच्या खुनापर्यंत नेणाऱ्या घटनांची साखळी जोडताना हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले.
पोलिसांच्या हाती पुरावे लागताच त्यांनी लोकेन्द्रची पत्नी, महेश प्रजापती आणि त्याचा मित्र धर्मवीर या तिघांना ताब्यात घेतले. तिघांकडे कसून चौकशी केली असता, लोकेन्द्रच्या खुनामागील धक्कादायक कारण समोर आले. महेश प्रजापतीने कबुल केले की, त्याचे लोकेन्द्रच्या पत्नीसोबत बऱ्याच काळापासून अनैतिक संबंध होते. अलीकडेच, लोकेन्द्रला त्यांच्या या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली आणि त्याने आपल्या पत्नीला जाब विचारला. त्यानंतर, या प्रेमीयुगुलाने लोकेन्द्रचा खून करण्याचा कट रचला.
१ एप्रिल रोजी लोकेन्द्र घरातून बाहेर पडताच याची माहिती त्याच्या पत्नीने महेशला फोन करुन दिली. महेश लोकेन्द्रला वाटेत भेटला. दोघांची पूर्वीची ओळख होती. त्याने लोकेन्द्रला दारु पिण्याचे प्रलोभन दाखवले. लोकेन्द्रने त्याला होकार दिला. त्यानंतर धर्मवीरही येथे आला. त्यांनी दारू आणि खाण्यासाठी काही पदार्थ घेतले. एका शेतात बसून मद्यपान करण्यास सुरुवात केली. काही वेळातच महेश आणि धर्मवीर यांनी लोकेन्द्रचा गळा आवळला. तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्यांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतले, ते गव्हाच्या पेंढ्यांनी झाकले आणि त्याला आग लावली. दोघेही घटनास्थळावरुन पसार झाले.
पश्चिम आग्रा विभागाचे पोलीस उपायुक्त आदित्य कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली होती. घटनास्थळी पोलिसांना कागदाचे काही तुकडे सापडले. चौकशी केली असता, परिसरातील एक फळविक्रेता ग्राहकांना फळे देण्यासाठी नेमके असेच कागद वापरत असल्याचे समजले. घटनास्थळी सापडलेल्या दारूच्या बाटल्यांवरील क्यूआर कोड हा तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला. तसेच 'लोकेन्द्र'च्या हातावरील कोपराखालील भागावर एक टॅटू दिसला. त्यावर असे नाव कोरलेले होते. त्यामुळे मृतदेह अर्धवट जळाला असला तरी त्याची ओळख पटली. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींचा माग काढला.