विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ले जिल्ह्यात सोमवारी पहाटे टाटानगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. एलामंचिली रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनच्या दोन एसी कोचमध्ये (1 आणि 2) अचानक आग लागली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून रेल्वे प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवले आहे.
अनाकापल्लेचे पोलिस अधीक्षक तुहिन सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार व सोमवारच्या मध्यरात्री 12.45 च्या सुमारास ही आग लागली. आग लागली तेव्हा 1 कोचमध्ये 82 आणि दुसर्या कोचमध्ये 76 प्रवासी प्रवास करत होते. आगीच्या ज्वाला वेगाने पसरल्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या गोंधळात विजयवाडा येथील रहिवासी चंद्रशेखर सुंदर यांचा मृत्यू झाला. ते डब्यात अडकल्याने त्यांना वेळेवर बाहेर काढता आले नाही.
बचावकार्य आणि प्रवाशांची सोय
आग लागताच रेल्वे कर्मचार्यांनी प्रसंगावधान राखून गाडी थांबवली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. बाधित प्रवाशांना त्यांच्या पुढील ठिकाणी पोहोचवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष बसची व्यवस्था करण्यात आली.
रेल्वे वाहतुकीवर परिणाम
या दुर्घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुरी-तिरुपती एक्स्प्रेस, शालीमार-चिराला एक्स्प्रेस आणि विशाखापट्टणम-लिंगमपल्ली एक्स्प्रेस यांसह अनेक गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. सध्या या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत होत असल्याची माहिती वाल्टेअर विभागाच्या अधिकार्यांनी दिली आहे.