नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून पुन्हा सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये विविध मुद्द्यांवरुन तीव्र संघर्ष पाहायला मिळणार असून यामुळे दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळाची शक्यता आहे. यासोबतच मणिपूरचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष मतदार यादीतील कथित फेरफार, मणिपूरमधील हिंसाचाराची घटना आणि ट्रम्प प्रशासनाचे भारतासोबतचे व्यवहार यासारखे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे समजते. दुसरीकडे, सरकारचे लक्ष अर्थसंकल्पीय प्रक्रिया पूर्ण करणे, अनुदान मागण्यांसाठी संसदेची मान्यता मिळवणे, वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर करणे आणि मणिपूरच्या अर्थसंकल्पाला मान्यता मिळवणे यावर असेल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी संसदेची मंजुरी मिळविण्यासाठी एक वैधानिक ठराव मांडणार आहेत. यासोबतच, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मणिपूरचा अर्थसंकल्प सादर करतील. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर १३ फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. दुसरीकडे, विरोधक बनावट निवडणूक फोटो ओळखपत्र क्रमांकांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची तयारी करत असल्याचे समजते. हा मुद्दा उपस्थित करण्यात तृणमूल काँग्रेस आघाडीवर असण्याची शक्यता आहे.
अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वक्फ दुरुस्ती विधेयक लवकरात लवकर मंजूर करणे हे केंद्र सरकारचे प्राधान्य असेल. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, सरकार वक्फ दुरुस्ती विधेयक लवकरच मंजूर करण्यास उत्सुक आहे. कारण त्यामुळे मुस्लिम समुदायाचे अनेक प्रश्न सुटतील. या विधेयकाबाबत विरोधकांच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर, संसदेच्या संयुक्त समितीने लोकसभेत आपला अहवाल सादर केला आहे. यामुळे यावरुन जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. याव्यतिरीक्त लोकसभा मतदारसंघांच्या सीमांकनाच्या मुद्द्यावरूनही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. या संदर्भात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, इंडिया आघाडीचे नेते वक्फ विधेयकाला एकत्रितपणे विरोध करण्यासाठी व्यापक चर्चा करतील. दरम्यान, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत चालला होता. दुसरा टप्पा १० मार्चपासून सुरू होईल आणि ४ एप्रिलपर्यंत चालेल.