पुढारी ऑनलाईन डेस्क : मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी सादर केला. सीतारामन यांनी सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. यात उत्पादनं आणि सेवा यांच्यावर लागू होणाऱ्या प्रत्यक्ष (डायरेक्ट) आणि अप्रत्यक्ष (इन-डायरेक्ट) करांमध्ये बदल केले आहेत. त्यामुळे काही वस्तू स्वस्त होतील, तर काहींच्या किमती वाढू शकतात. मुख्यतः कर्करोगाच्या औषधांवर आणि इलेक्ट्रिक वाहनांवरील कर कमी करण्यात आला आहे. तर अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आता कोणत्या वस्तू स्वस्त आणि महाग होणार याविषयी माहिती जाणून घेवूयात...
निर्मला सीतारामन यांनी कोण-कोणत्या गोष्टी स्वस्त होणार याची घोषणा केली. त्यामध्ये टीव्ही, इलेक्ट्रिक कार, मोबाईल फोन, एलईडी, एलसीडी टीव्ही, कर्करोगावरील औषधे आणि भारतात निर्माण होणारे कपडे स्वस्त होणार आहेत.
सरकारने आणखी ३७ औषधांवर बेसिक कस्टम ड्युटीतून सूट देण्याचा प्रस्ताव मांडला आहे.कर्करोग, दुर्मिळ आजारांसाठी असलेल्या ३६ औषधांनाही बेसिक कस्टम ड्युटीतून सूट देण्यात आली आहे. कोबाल्ट उत्पादन, एलईडी, झिंक, लिथियम-आयन बॅटरी स्क्रॅप आणि १२ गंभीर खनिजांना बेसिक कस्टम ड्युटीतून पूर्णपणे सूट देण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. तसेच जहाजांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालावर बेसिक कस्टम ड्युटी आणखी १० वर्षांसाठी सूट देण्यात आली आहे. केंद्राने हस्तकला निर्यातीला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर केली आहे.सरकार ओल्या निळ्या चामड्याला बेसिक कस्टम ड्युटीतून पूर्णपणे सूट देईल.
सर्वसामान्यांचे घर घेण्याचं स्वप्न मात्र महागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात घरं महागणार आहेत. तर या सोबतच विदेशी कपडे महाग होणार आहेत.