Jammu Kashmir Terror Encounter : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील अशदार गली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या जोरदार चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सैन्याला यश आले. भारतीय सेना, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ (CRPF) यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, अशदार गली परिसरातील जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय सैन्याच्या 'चिनार कॉर्प्स', काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकाने परिसरात संयुक्त शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. सुरक्षा दलांनी जंगलाला चारही बाजूंनी वेढा घातल्याचे लक्षात येताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सैनिकांच्या दिशेने अंधाधुंद गोळीबार सुरू केला.
सुरक्षा दलांनी तातडीने प्रत्य्युत्तराखल केलेल्या कारवाईत एक दहशतवादी जागीच ठार झाला. घटनास्थळावरून सैन्याने एक 'एके-४७' (AK Rifle) रायफलसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला आहे. या परिसरात एक ते दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून सुरक्षा दलांनी संपूर्ण जंगलाची नाकेबंदी केली आहे. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कराची शोधमोहीम अजूनही तीव्र गतीने सुरू आहे.