पुढारी ऑनलाईन डेस्क : Tamil Nadu Encounter : तामिळनाडूतील बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांच्या हत्येतील एका आरोपीचा शनिवारी (दि. 14) रात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, आर्मस्ट्राँग यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचा शोध घेण्यासाठी आरोपी थिरुवेंगदम याला माधवरमजवळील एका ठिकाणी नेण्यात आले. यादरम्यान त्याने पोलिसांवर हल्ला करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. ज्यात थिरुवेंगदमचा मृत्यू झाला.
आर्मस्ट्राँग यांची तामिळनाडूची राजधानी चेन्नईत 5 जुलै रोजी सायंकाळी हत्या करण्यात आली. तीन दुचाकींवर आलेल्या मारेकऱ्यांनी आर्मस्ट्राँगवर चाकूने हल्ला केला आणि करून घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी थिरुवेंगदम याला अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, थिरुवेंगदमने अनेक दिवस आर्मस्ट्राँग यांचा पाठलाग केला आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा केली, त्यानंतर कट रचून त्याने आर्मस्ट्राँग यांची हत्या घडवून आणली, असा थिरुवेंगदमवर आरोप होता.
आर्मस्ट्राँगच्या हत्येप्रकरणी 11 जणांना 5 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. के 1 सेंबियम पोलीस तपास करत आहेत. या चकमकीत मारल्या गेलेला संशयीत आरोपी थिरुवेंगदमच्या शरीराच्या उजव्या खांद्यावर आणि छातीवर गोळ्यांच्या खुणा आढळल्या. यानंतर पोलिसांनी थिरुवेंगदमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चेन्नईच्या स्टॅनले सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. थिरुवेंगदमवर यापूर्वीच 5 गुन्हे दाखल आहेत, त्यात 2 खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.