मायावती आणि त्यांचा भाचा आकाश आनंद.  file photo
राष्ट्रीय

BSP प्रमुख मायावतींचा मोठा निर्णय, उत्तराधिकारी नेमला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क  

बसपा अध्यक्ष मायावती यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून अखेर आकाश आनंद यांच्या नावाची घोषणा केली आहे. आकाश आनंद हे मायावती यांचे भाचे आहेत. आकाश आनंद आता राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी सांभाळतील, अशी माहिती बसपा नेते सरवर मलिक यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा जिंकता आली नाही. आता बहुजन समाज पक्षाच्या (BSP) प्रमुख मायावती यांनी रविवारी त्यांचा भाचा आकाश आनंद यांच्या नावाची त्यांचे राजकीय वारसदार आणि पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक म्हणून घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या खराब कामगिरीचा आढावा घेण्यासाठी लखनौ येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतची पुष्टी बसपा नेत्यांनी केली आहे. याआधी मे महिन्यात मायावतींनी त्यांना पदावरून हटवले होते आणि सांगितले होते की, “पक्षाची कोणतीही जबाबदारी देण्यापूर्वी त्यांच्याकडे प्रगल्भता यायला हवी.”

लखनौ येथील बैठकीला राज्यभरातील पक्षाचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते आणि जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते. आनंद देखील या बैठकीला उपस्थित होते.

पराभवानंतर काय आहे बसपाची रणनिती?

लोकसभा निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळवता न आल्याची कारणे शोधणे हा या बैठकीचा प्राथमिक अजेंडा होता. तसेच आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी रणनिती आखण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.

मागील मे महिन्यात मायावतींना आनंद यांना त्यांच्या पदावरून हटवले होते. तरीही आनंद यांना त्यांना पाठिंबा दिला होता. “बसपा प्रमुख मायावती, तुम्ही संपूर्ण बहुजन समाजासाठी आदर्श आहात. कोट्यवधी देशवासीयांच्या मनात तुमच्याविषयी मानाचे स्थान आहे. तुमच्या (मायावती) संघर्षामुळेच आज आपल्या समाजात अशी राजकीय ताकद आहे, ज्यामुळे बहुजन समाज सन्मानाने जगायला शिकला. तुमचा आदेश हा माझ्यासाठी आज्ञा असेल. मी अखेरच्या श्वासापर्यंत भीम मिशन आणि माझ्या समाजासाठी लढत राहीन”, अशी भावना आनंद यांनी व्यक्त केली होती.

बसपाची पिछेहाट

बसपाची यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये चारवेळा सत्ता राहिली होती. पण आता पक्षाची पिछेहाट झाली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० जागा मिळाल्या होत्या. पण नुकत्याच पार पडलेल्या २०२४ च्या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. २०१९ मधील १९.२ टक्क्यांच्या तुलनेत त्यांच्या मतांची टक्केवारी आता ९.३ टक्क्यांपर्यंत खाली आली. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतांची टक्केवारी सर्वात कमी राहिली होती. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ १२.८ टक्के मते मिळाली होती.

मायावतींनी आकाश यांच्यावर केली होती कारवाई

सीतापूरमधील जाहीर सभेत आकाश आनंद यांनी भाजप नेत्यांची तुलना दहशतवाद्यांशी केली होती. हे प्रक्षोभक भाषण आकाश आनंद यांना चांगलेच भोवले. त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. बसपा प्रमुख मायावती यांनी ही बाब गांभीर्याने घेत आकाश आनंद यांच्या रॅलीच्या आयोजनावर बंदी घातली होती. असे असतानाही ते दिल्लीतील पक्ष समर्थक, विद्यार्थी, शिक्षक आदींशी संपर्क साधत राहिले आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांना लक्ष्य करत राहिले. अखेर मायावतींनी त्यांना दोन्ही महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवरून हटवले होते.

कोण आहेत आकाश आनंद?

आकाश आनंद हा मायावती यांचा लहान भाऊ आनंद कुमार यांचा मुलगा आहे. आकाश यांनी लंडनमध्ये एमबीएचे शिक्षण घेतले आहे. आकाश गेल्या काही वर्षापासून पक्षात सक्रिय आहेत. २०१७ च्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मायावती यांनी त्यांना राजकारणात आणले होते. पण तरीही पक्षाच्या कामगिरीत सुधारणा झालेली नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT