BSF jawan detained by Pakistan Rangers
पंजाब : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. यादरम्यान एक घटना समोर आली. बुधवारी चुकून पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला पाकिस्तान रेंजर्संनी ताब्यात घेतले.
या जवानाच्या सुरक्षित सुटकेसाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर ध्वज बैठक (प्लॅग मीटिंग) सुरू आहे, असे वृत्त पीटीआयने दिले आहे.
२२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. अशा परिस्थितीत आता चुकून पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केलेल्या एका बीएसएफ जवानाला पाकिस्तान रेंजर्संनी ताब्यात घेतले.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. भारताने १९६० चा सिंधू जल करार तात्काळ प्रभावाने स्थगित केला. अटारी सीमा तत्काळ प्रभावाने बंद केली असून १ मेपर्यंत पाकिस्तानी नागरिकांनी परत जावे, असे सांगण्यात आले आहे. तसेच भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठीची व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित केली.
सध्या भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी भारत सोडावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले. तसेच भारतीय नागरिकांना पाकिस्तानचा प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांनाही लवकरात लवकर भारतात परतावे, असे परराष्ट्र मंत्रालयाने नमूद केले आहे.
पंजाबमधील फिरोजपूरजवळ बुधवारी ही घटना घडली. १८२ व्या बटालियनचे कॉन्स्टेबल पीके सिंग त्यांच्या सर्व्हिस रायफलसह स्थानिक शेतकऱ्यांसोबत सावलीच्या शोधात जात असताना चुकून त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी लष्करी पातळीवर बैठक सुरु आहे.