Mamata Banerjee challenges Modi of live TV debate Operation Bengal controversy Operation Sindoor Operation Bengal controversy
कोलकाता : 'ऑपरेशन सिंदूर'वरून पश्चिम बंगाल सरकार आणि मोदी सरकार यांच्यात टीकाटिपण्णी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या 'ऑपरेशन बंगाल' या टीकेला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका करत त्यांना थेट लाईव्ह टीव्ही डीबेटचे आव्हान दिले आहे. "तुम्ही तुमचा टेलिप्रॉम्प्टर घेऊन या, मी चर्चेसाठी सज्ज आहे – समोरासमोर थेट टीव्हीवर," अशा शब्दात ममतांनी मोदींना दिलेल्या चॅलेंजमुळे देशभरात चर्चेचं वादळ उठलं आहे.
एकीकडे तृणमुल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देशाचं प्रतिनिधित्व करत असताना, ममतांनी केंद्र सरकारवर राज्याला बदनाम केल्याचा आरोप करत भाजपला तत्काळ निवडणुका घेण्याचं थेट आव्हान दिलं आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करत असताना, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालच्या सरकारवर टीका करत 'ऑपरेशन बंगाल' असा उल्लेख केला. यावर ममता बॅनर्जी संतापल्या.
त्या म्हणाल्या की, "आज जेव्हा आमचा खासदार देशाच्या बाजूने आंतरराष्ट्रीय स्तरावर उभा आहे, तेव्हा पंतप्रधान बंगालमध्ये येऊन आमच्या राज्याला बदनाम करत आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' या मोहिमेचा राजकीय लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारने हा शब्द तयार केला आहे."
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधानांनी 'ऑपरेशन बंगाल' असा उल्लेख करून संपूर्ण बंगालच्या जनतेचा अपमान केला आहे. मोदींनी बंगालच्या महिलांचा अपमान केला आहे. जर तुम्हाला इतकंच वाटतं, तर उद्याच निवडणुका घ्या. आम्ही तयार आहोत!"
'निर्ममता' वरून पलटवार
पंतप्रधान मोदींनी मुर्शिदाबाद आणि मालदा येथील हिंसाचारावरून ममता सरकारवर 'निर्ममता' (क्रौर्य) चा आरोप केला. यावर तृणमूल काँग्रेसने सोशल मीडियावर प्रत्युत्तर देत एक व्यंगचित्र पोस्ट केलं.
त्यातून "दिदी (ममता बॅनर्जी) ने सत्य बोलून 'निर्ममता' दाखवली," असा टोमणा पंतप्रधानांना लगावला आहे.
तसेच त्यांनी भाजपने बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेवर केलेल्या आरोपांवर उत्तर देताना, मध्य प्रदेशातील भाजपचा नेता मनोहरलाल धाकड याने हायवेवर केलेल्या किळसवाण्या घटनेचा उल्लेख केला.
त्यावर बोलताना ममता म्हणाल्या की, तुम्हाला लाज वाटत नाही का? रस्त्यावर जणू काही ब्ल्यू फिल्मच सुरू होती आणि तुम्ही आम्हाला कायदेभंगाचे धडे देताय?"
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजपचा हेतू विरोधकांचे आंतरराष्ट्रीय प्रयत्न दुर्लक्षित करण्याचा आहे. ऑपरेशन सिंदूर हा केवळ एक राजकीय स्टंट आहे. जेव्हा विरोधक राष्ट्रीय हितासाठी काम करत आहेत, तेव्हा केंद्र सरकार राजकीय होळी खेळत आहे.
दरम्यान, या आरोपप्रत्यारोपांमुळे बंगालमधील राजकारण आणखी तापले आहे. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यातील हा वाद पुढे काय वळण घेईल, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.