Madhya Pradesh crime file photo
राष्ट्रीय

Madhya Pradesh crime: ‘सुंदर नाहीस’ म्हणत पतीने नववधूचा केला अमानुष छळ; शरीरावर गरम चाकूने दिले ५० हून अधिक चटके

नववधूला पतीने ‘सुंदर नाहीस’ असा आरोप करून गरम चाकूने भाजले. तिच्या अंगावर तब्बल ५० हून अधिक भाजल्याचे डाग आढळले आहेत.

मोहन कारंडे

Madhya Pradesh crime

मध्य प्रदेश : 'तू सुंदर दिसत नाहीस' असे म्हणत पतीने आपल्या नवविवाहित पत्नीला गरम चाकूने चटके देऊन अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशमध्ये बडवानी जिल्ह्यातील अंजड येथे घडली आहे. पीडितेच्या शरीरावर ५० हून अधिक चटक्यांचे व्रण आढळून आले आहेत. या अत्याचाराला कंटाळून पीडितेने सोमवारी खरगोन जिल्ह्यातील आपले माहेर गाठून पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

सुंदर दिसत नाहीस म्हणत करायचा छळ

खरगोन जिल्ह्यातील मेंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवरकच्छ गावची रहिवासी असलेल्या खुशबू हिचा विवाह २ फेब्रुवारी रोजी बडवानी जिल्ह्यातील अंजड येथील भंगार व्यावसायिक दिलीप पिपलिया याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती दिलीप तिच्याशी नीट वागत नव्हता. 'तू सुंदर नाहीस,' असे टोमणे मारून तो तिचा सतत अपमान करत होता, असा आरोप खुशबूने केला आहे. रविवारी रात्री दिलीप दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने खुशबूला बेदम मारहाण केली. त्यानंतर तिला फरफटत स्वयंपाकघरात नेले. तिथे तिचे हात-पाय बांधून गॅसवर चाकू गरम केला आणि तिच्या दोन्ही हातांवर, पाठीवर आणि कमरेवर अनेक ठिकाणी चटके दिले. तिच्या शरीरावर चटक्यांचे सुमारे ५० व्रण स्पष्ट दिसत आहेत.

हुंड्यासाठी छळाचाही आरोप

या घटनेनंतर खुशबूने माहेरी परत येऊन जैतापूर पोलिसांत पतीविरोधात तक्रार दाखल केली. खरगोनचे पोलीस अधीक्षक धर्मराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती दिलीप पिपलिया याच्यावर आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी छळाचाही आरोप पीडिता खुशबूचे वडील लोकेश वर्मा यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, "दिलीपचे कुटुंबीय लग्नापासूनच खुशबूचा हुंड्यासाठी छळ करत होते. सोमवारी दुपारी ते दोन गाड्या भरून आमच्या घरी आले आणि खुशबूला परत पाठवले नाही, तर गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली," असा आरोपही त्यांनी केला.

सासरच्यांनी आरोप फेटाळले

सासरच्या मंडळींनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. उलट खुशबूने स्वतःच स्वतःला चटके दिले आहेत, असा दावा त्यांनी केला. दिलीपला खुशबू पसंत होती आणि त्याने मोठ्या थाटामाटात तिच्याशी लग्न केले होते, असेही त्यांनी सांगितले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT