BRICS Summit 2026 | दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ठेवा; भारताचे आवाहन 
राष्ट्रीय

BRICS Summit 2026 | दहशतवादाविरोधात झिरो टॉलरन्स ठेवा; भारताचे आवाहन

ब्रिक्स परराष्ट्रमंत्र्यांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन दिवसीय शिखर परिषदेला गुरुवारी सुरुवात झाली. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित परिषदेची सांगता शुक्रवारी होईल. या परिषदेचे अध्यक्षस्थान भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भूषवत आहेत. शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी बोलताना त्यांनी ब्रिक्स राष्ट्रांना दहशतवादाविरोधात ’शून्य सहनशीलता’ (झिरो टॉलरन्स) बाळगण्याचे आवाहन केले.

तसेच, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह बहुपक्षीय व्यवस्थेत सुधारणांची तातडीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यावेळी इराणने अमेरिका आणि इस्राएलचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन सदस्य राष्ट्रांना केले.

जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर भाष्य करताना जयशंकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय शांतता आणि स्थिरतेसाठी दहशतवाद हा एक मोठा धोका बनला आहे. हा एक निरंतर असलेला धोका आहे. दहशतवादाच्या कोणत्याही स्वरूपाचे समर्थन होऊ शकत नाही, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी सीमापार दहशतवादाचाही तीव्र शब्दांत निषेध केला आणि हा प्रकार आंतरराष्ट्रीय संबंधांचे नियमन करणार्‍या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करणारा असल्याचे स्पष्ट केले.

ब्रिक्स राष्ट्रांनी अमेरिका-इस्रायलचा निषेध करावा : इराणचे आवाहन

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी अमेरिका आणि इस्राएलचा निषेध व्यक्त करण्याचे आवाहन ब्रिक्स राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय समुदायातील सदस्यांना केले. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि अलीकडील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इस्रायलकडून होणार्‍या आंतरराष्ट्रीय कायद्याच्या उल्लंघनाचा निःसंदिग्धपणे निषेध करण्याचे आवाहन त्यांनी केले. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना अराघची म्हणाले दक्षिणेकडील देश हे जगाच्या भविष्याचे मुख्य शिल्पकार आहेत, असे अराघची म्हणाले.

दरम्यान, या शिखर परिषदेत ब्रिक्स राष्ट्रांपैकी ब्राझील, रशिया, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चीन दौर्‍यामुळे चीनचे परराष्ट्रमंत्री सहभागी होऊ शकले नाहीत. यासोबत इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचे परराष्ट्र मंत्री देखील सहभागी झाले आहेत.

सुरक्षित जलवाहतुकीचे आवाहन

एस. जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय जलमार्गांतून सुरक्षित सागरी वाहतुकीचे आवाहन केले. कारण जगातील एकूण तेल आणि वायूच्या पाचवा हिस्सा ज्यातून वाहून नेला जातो, ती ’हॉर्मुझची सामुद्रधुनी’ सध्या नाकेबंदीखाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT