नवी दिल्ली : 'भारत मंडपम' येथे पार पडलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी सदस्य देशांच्या नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, कझाकस्तानचे राष्ट्राध्यक्ष कासिम-जोमार्ट तोकायेव, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फत्ताह अल-सिसी आदी.  (पीटीआय फोटो)
राष्ट्रीय

BRICS Summit 2026 | डॉलरला शह देण्‍यासाठी ‘ब्रिक्‍स’ एकवटले

नरेंद्र मोदी, पुतीन, जिनपिंग या शक्‍तिशाली नेत्‍यांनी दिला अमेरिकेला ठोस संदेश

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली; वृत्तसंस्‍था : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी लादलेल्‍या मनमानी टॅरिफला आणि डॉलरच्‍या वाढत्‍या प्रभावाला शह देण्‍यासाठी ब्रिक्‍सने अनेक ठोस उपाययोजना करण्‍याचा निर्धार नवी दिल्‍लीत पार पडलेल्‍या दोन दिवसांच्‍या शिखर परिषदेत केला. विशेष म्‍हणजे ब्रिक्‍सचे अध्‍यक्ष असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष ब्‍लादिमीर पुतीन, चीनचे राष्‍ट्राध्‍यक्ष शी जिनपिंग यांच्‍यासह सर्व प्रमुख देशांची या मुद्द्यावर सहमती घडवत अमेरिकेला थेट संदेश दिला. जागतिक पातळीवर कोणतेही आर्थिक निर्णय घेताना ब्रिक्‍सला विचारात घ्‍यावे लागेल, असा संदेश (वर्ल्ड ऑर्डर) अमेरिकेला दिला आहे. अमेरिकेशी संबंध कायम राखत ब्रिक्‍स देशांचे स्‍थानिक चलन मजबूत करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आल्‍याने ही नवी आणि ठोस दिशेने वाटचाल असल्‍याचे मानले जाते.

या मुद्द्यांवर झाली एकजूट

१. ब्रिक्स 'डॉलर बायपास' पेमेंट सिस्टीम : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी डॉलरला पर्याय म्हणून नवीन पेमेंट सिस्टम सुरू करण्याची योजना मांडली. या व्यवस्थेमुळे ब्रिक्स देशांना अमेरिकेच्या 'स्विफ्ट' प्रणालीवर किंवा अमेरिकन बँकांवर अवलंबून न राहता एकमेकांसोबत थेट व्यापार करता येईल. यामुळे अमेरिकेच्या आर्थिक निर्बंधांचा इतर देशांच्या व्यापारावर होणारा परिणाम पूर्णपणे रोखता येईल.

२. स्थानिक चलनांमध्ये व्यापार : ब्रिक्स देशांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अमेरिकन डॉलरऐवजी आपापल्या स्थानिक चलनांचा (उदा. रुपया, युआन, रुबल, दिरहाम) वापर वाढवण्यावर एकमत केले आहे. भारत आणि चीन या जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांनी तसेच इराण आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या ऊर्जा पुरवठादार देशांनी आपापसातील व्यापार आपापल्या चलनांमध्ये सेटल करण्यास गती देण्याचे ठरवले आहे.

३. सामायिक चलनाची चर्चा : तत्काळ कोणतीही एकच सामायिक ब्रिक्स करन्सी बाजारात आणली नसली, तरी डिजिटल चलनांच्या माध्यमातून सामायिक वित्तीय चौकट तयार करण्यावर देशांचे काम सुरू आहे. याच्या मदतीने डॉलरशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर मूल्य निश्चित करणे सोपे होईल.

४. एकतर्फी आर्थिक निर्बंधांना विरोध : परिषदेनंतर जाहीर झालेल्या 'नवी दिल्ली जाहीरनाम्यात' अमेरिकेकडून घालण्यात येणाऱ्या एकतर्फी आर्थिक निर्बंधांवर आणि व्यापार अडथळ्यांवर कडक शब्दांत आक्षेप घेण्यात आला. हे निर्बंध जागतिक व्यापाराचे नियम बिघडवतात आणि 'डब्ल्यूटीओ'च्या तत्त्वांचे उल्लंघन करतात, असे ब्रिक्स देशांनी स्पष्ट केले आहे.

मलेशियन पंतप्रधानांचे ‘ख्वाब हो तुम...’

नवी दिल्ली : मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी शनिवारच्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या डिनर दरम्यान भारतीय संगीताच्या प्रति असलेले त्यांचे प्रेम अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केले. या डिनर पार्टीत त्यांनी बॉलिवूडचे दिग्गज गायक किशोर कुमार यांचे अजरामर गाणे ‘ख्वाब हो तुम या कोई हकीकत...’ आणि मुकेश यांचे लोकप्रिय गीत ‘दोस्त दोस्त ना रहा...’ अगदी मन लावून गुणगुणले. त्यांच्या या अनपेक्षित आणि सुरेल गायनाने उपस्थितांची मने जिंकली. विशेष म्हणजे अन्वर इब्राहिम यांनी या सुंदर क्षणाचा व्हिडीओ त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर केला आहे. हा सुमारे दीड मिनिटाचा व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी ‘गुरू, थोड़ा सा गाने की इजाजत है?’ असा मजकूर लिहिला आहे. त्यांच्या या दिलखुलास आणि साध्या स्वभावाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT